संस्कारक्षम कुटुंब हवेच!

    दिनांक :15-Sep-2025
Total Views |
 
वेध....
 
cultured family नुकतेच आपला शेजारी देश नेपाळमध्ये युवावर्गाचे मोठे आंदोलन भडकले. रस्त्यावर उतरून त्यांनी केवळ जाळपोळच केली नाही, तर देशातील सत्ताही उलथून टाकली. एवढेच काय तर, उपपंतप्रधानांसह मोठमोठ्या मंत्र्यांना अक्षरश: पळवून-पळवून मारले. तेथील संसद पेटवली, शासकीय इमारती नष्ट केल्या. नेपाळमधील सर्वांत लक्झरी हॉटेलही पेटवून दिले. या सर्वांमागे नेमके कारण काय, याचा शोध घेतला असता लक्षात आले की, जेन झेड म्हणजे जनरेशन झेडच्या मनात सत्ताधारी नेते, सेलिब्रिटी, त्यांचे कुटुंब यांच्याविषयी प्रचंड संताप होता. हे सर्व अतिशय आलिशान जीवन जगत आहेत, याची या युवा वर्गाच्या मनात चीड निर्माण झाली. आपल्याला प्रतिकूलतेत जगावे लागत असताना, अस्थिरतेत राहावे लागत असताना हे सर्व शाही जीवन जगतातच कसे, असा त्यांचा संताप होता. त्यासाठी समाज माध्यमांवर आलेली बंदी हे तात्कालीक कारण ठरले.
 
 

नेपाळ  
 
 
हा उद्रेक पाहता वाटले की, या सर्वांच्या घरच्यांना आता नेमके काय वाटत असेल? आपले मूल रस्त्यावर उतरून सर्रास गुन्हे करीत सुटलेय्, हे पाहून या कुटुंबातील सदस्यांच्या भावना नेमक्या काय असतील? त्यांच्या भावना काहीही असल्या तरी शेवटी सगळे मुद्दे संस्कारांवर येऊन थांबतात. आयुष्यातील संघर्ष कोणालाच चुकलेला नाही. अगदी धीरूभाई अंबानीदेखील प्रचंड संघर्ष करूनच वर आले. अशी असंख्य उदाहरणे आहेत. पण मग संघर्ष करताना संयमाने राहिले पाहिजे, हे तत्त्व या ग्रेट लोकांनी पाळले. नेपाळमधील ‘जेन झी’ला हा संघर्ष असह्य का झाला? सरळ उत्तर आहे की, त्यांचे संस्कार कमी पडले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संस्कारांचाच खेळ दिसतो. यश असो किंवा अपयश ते हाताळण्यासाठी संस्कारच हवे असतात. दोन्ही गोष्टी संयमानेच हाताळायच्या असतात. संयमाचे संस्कार कुटुंबातून व्हावे लागतात म्हणून आज संस्कारक्षम कुटुंब गरजेचे आहे. मग ती कोणत्याही देशातील पिढी असो...
कुटुंब केवळ निवाèयासाठी नाही, तर सर्व प्रकारच्या आधारासाठी गरजेचं असतं. सर्वांत मोठी गरज ही मानसिक आणि भावनिक आधाराची असते. हा आधार एक मजबूत कुटुंबच देऊ शकते. ही बाब आपल्या पूर्वजांना चांगली ठावूक होती. त्यामुळे भारतात बèयाच प्रमाणात कुटुंब व्यवस्था टिकून राहिली आहे. नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी किंवा बाहेरदेशात राहणाऱ्यांना विभक्त कुटुंबात राहावे लागते. पण, असे असूनही ते सणवार किंवा कार्यप्रसंगाच्या निमित्ताने आपल्या मूळ कुटुंबाशी जोडलेले राहतात. हीच भारतीय संस्कृतीची ताकद आहे. यामुळेच आपले बाहेर देशात असणारे कुटुंबीय सर्व सणवार परक्या देशातही पारंपरिक पद्धतीने साजरे करतात आणि आपली संस्कृती तिथेही जपतात. त्यातील अनेकजण सांगतात की, देशापासून, कुटुंबापासून दूर गेल्यानंतर आपल्या सर्व गोष्टींविषयी जास्त आपुलकी आणि ओढ वाटते.cultured family हेच आपले संस्कार आहेत आणि हीच आपल्या संस्कारांची ताकद आहे, जी आपल्या देशातील पूर्वापार चालत आलेल्या कुटुंब व्यवस्थेने दिली आहे. नेपाळसारख्या देशात कदाचित याचा अभाव असल्याने तेथील नवी पिढी अशी बेफाम आणि बेदरकार वागू लागली असावी.
भारतातही प्रतिकूलता आहेच, बेरोजगारीही आहे. मात्र, आजही आपल्या कौटुंबिक मूल्यांनी असंख्य लोकांना डगमगण्यापासून वाचवले आहे. अनेक समाज असे आहेत, जिथे तेथील लोक एखाद्याला स्थिरस्थावर करण्यासाठी एक होतात आणि पुरेसे पाठबळ देतात. हीच भावना राष्ट्रीयत्वाच्या दृष्टिकोनातून राहिली तर कदाचित एखाद्या बुडत्याला आधार देण्यासाठी कोणीही पुढे सरसावेल. जोपर्यंत एखाद्या गरजूच्या पाठीशी समाजातील किमान एकजण जरी उभा असेल, तोवर तो समाज तुटू शकत नाही. अर्थात, यासाठी संपूर्ण समाज माझे कुटुंब ही भावना निर्माण व्हायला हवी. हीच मानवीय दृष्टी नव्या पिढीला घडवण्यासाठी आवश्यक आहे. चांगले जीवन जगण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता आहे, हे सांगणारे कौटुंबिक वातावरण समाजात निर्माण झाले पाहिजे. असे झाले तर कोणत्याही देशातील युवा पिढी अशी बेताल वागणार नाही. भविष्याचे चित्र आशादायीच राहील.

सोनाली पवन ठेंगडी
7755938822