नागभीड,
enomous snakes rescue पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी काम करणार्या स्वाब नेचर केअर फाउंडेशनच्या सर्पमित्रांनी चिखलगाव येथील मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या अंदाजे साडेपाच फूट लांबीच्या अजगराला सुरक्षित काढून जंगलात निसर्गमुक्त केले. यंदाच्या पावसाळ्यात संस्थेच्या सर्पमित्रांनी शेकडो विषारी, बिनविषारी सापांना जीवनदान दिल्याचे म्हटले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात संस्थेच्या सर्पमित्रांनी तीन अजगर, तीन घोरपडी, तसेच शेकडो नाग, मण्यार, घोणस, सारखे विषारी, धूर नागिण, कवड्या, कुकरी, रुका, तस्कर, नानोटी, धामणसारख्या बिनविषारी, तर फार्टेन कॅटस्नेक, मांजर्या, सारख्या निम विषारी सापांना गावातून-घरातून पकडून सुरक्षित जंगलात सोडून जीवदान दिले आहे. सिंदेवाही, नागभीड, चिमुर, ब्रम्हपुरी तालुक्यातील आजूबाजूच्या गावांमधून संस्थेच्या सर्पमित्रांना पाचारण केले जाते. संस्थेचे सर्पमित्र त्या सापांना पकडून वनविभागात नोंद करून त्यांना जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडतात.
शाळा, महाविद्यालय, सांस्कृतिक महोत्सवात सर्पदंश, सापाबद्दलच्या श्रद्धा, अंधश्रद्धा या विषयानुषंगाने मार्गदर्शन कार्यक्रम राबवून जनजागृतीही केली जाते. सोबतच परिसरातील जंगलात असलेल्या पर्यटन क्षेत्र, तलाव परिसर, धार्मिक स्थळांवरील संपूर्ण प्लास्टिक कचरा वर्षभर गोळा करून परिसरातील जंगलाला प्लास्टिक मुक्त ठेवण्याचा प्रयत्न संस्थेद्वारा करण्यात येत आहे. तसेच परिसरातील जंगलात असलेल्या गावांमध्ये आरोग्य शिबिर घेऊन औषधोपचार पुरवणे तसेच परिसरातील गरजुंपर्यंत चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, ब्रह्मपुरी सारख्या ठिकाणी मोफत रक्त पुरवठा करण्याचा काम, मानव वन्यजीव संघर्षाच्या वेळी वनविभागाला, तर नैसर्गिक आपदेच्या व आपत्कालीन स्थितीत पोलिस विभागाला सहकार्य, असे विविध प्रकारचे उपक्रम ही संस्था राबवून लोकांना व शासनाला सहकार्य करण्याचे कार्य करते.