नवी दिल्ली,
India-Pakistan will clash again आशिया कप २०२५ सुरू होताच सर्वांचे लक्ष ज्या सामन्याकडे होते तो म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर शानदार विजय मिळवत सुरुवातीला जोरदार धडक दिली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्याच गोलंदाजीत पाकिस्तानी फलंदाजांना झटपट गुंडाळले आणि त्यानंतर सहज विजय मिळवला. पण क्रिकेटप्रेमींच्या मनात आता एकच प्रश्न निर्माण झाला आहे, पुन्हा भारत-पाकिस्तानची टक्कर कधी होणार?

आशिया कप २०२५ ही स्पर्धा ९ ते २८ सप्टेंबरदरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये रंगत आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी असून त्यांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. ग्रुप-ए मध्ये भारत, पाकिस्तान, ओमान आणि युएई यांचा समावेश आहे, तर ग्रुप-बी मध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग आहेत. प्रत्येक संघ आपल्या गटातील तीन सामने खेळणार आहे. त्यामुळे गट फेरीत भारत-पाकिस्तानचा एक सामना आधीच पार पडला आहे. गटातील इतर संघ तुलनेने कमकुवत असल्याने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचे सुपर फोर फेरीत पोहोचणे जवळपास निश्चित मानले जात आहे. सुपर फोरमध्ये प्रत्येक संघ एकमेकांशी भिडणार असल्याने भारत-पाकिस्तान यांच्यात दुसरी टक्कर निश्चित आहे. हीच खरी स्पर्धेची रंगत वाढवणारी फेरी ठरणार आहे.
यापलीकडे जर भारत आणि पाकिस्तान दोघेही सुपर फोरमध्ये अव्वल दोन स्थानावर राहिले, तर अंतिम फेरीतही हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकतील. ही अंतिम भिडंत २८ सप्टेंबर रोजी होणार असून जगभरातील चाहत्यांचे डोळे या सामन्यावर खिळलेले असतील. त्यामुळे आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात किमान दोन सामने तर निश्चित आहेतच; पण दोन्ही संघांनी दमदार खेळ केल्यास तिसरी ऐतिहासिक टक्करही पाहायला मिळू शकते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात हा सामना खेळवला गेला. अनेकांनी या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध बहिष्कार घालावा अशी मागणी केली होती. तरीही बीसीसीआयने बहुराष्ट्रीय स्पर्धेचा नियम पुढे ठेवत हा सामना खेळवला. परिणामी मैदानावर भारतीय खेळाडूंनी आपल्या देशाची भावना आणि विजयाची जिद्द दाखवत पाकिस्तानला धूळ चारली.
आता सर्वांच्या नजरा सुपर फोरकडे लागल्या आहेत. पुढचा भारत-पाकिस्तान सामना पुन्हा दुबईत रंगण्याची शक्यता असून, जर परिस्थिती तशीच राहिली, तर अंतिम फेरीत तिसऱ्यांदा दोन्ही संघ आमनेसामने येतील. म्हणजेच, चाहत्यांना या आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानची तडफदार टक्कर दोनदा नव्हे तर तीनदा अनुभवता येण्याची मोठी शक्यता आहे.