मुंबई
Margan movie ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दर आठवड्याला काही ना काही नव्या चित्रपटांची रेलचेल असते. विशेषतः सस्पेन्स आणि क्राइम थ्रिलर प्रकारातील चित्रपटांमध्ये सध्या मोठी मागणी पाहायला मिळते. काही वेळा असे चित्रपट जे थिएटरमध्ये फारसे यशस्वी ठरत नाहीत, ते ओटीटीवर प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरतात. अशीच एक तमिळ चित्रपट 'मारगन' (Margan) सध्या ओटीटीवर जबरदस्त गाजत आहे.
'मारगन' हा चित्रपट २७ जून २०२५ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. सुरुवातीला मोठी चर्चा नसतानाही, ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने अक्षरशः प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. जिओ सिनेमा हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणारा हा चित्रपट सध्या ट्रेंडिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. दमदार सस्पेन्स, गुंतागुंतीचं कथानक आणि धक्कादायक क्लायमॅक्स यामुळे 'मारगन' हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
चित्रपटाची कथा सुरु होते राम्या नावाच्या मुलीच्या रहस्यमय खुनापासून. तिला एका विशिष्ट रासायनिक द्रव्याने भरलेल्या इंजेक्शनच्या माध्यमातून ठार मारण्यात येते. या इंजेक्शनमुळे तिचं शरीर काळं पडतं आणि पूर्णतः बधीर होतं. या विचित्र खुनाची माहिती माजी एडीजीपी ध्रुव गुवारक यांच्यापर्यंत पोहोचते, आणि ते या घटनेची तुलना आपल्या मुलीच्या निधनाशी करतात. त्यांना दोन्ही घटनांमध्ये एक साम्य दिसून येते. याच अनुषंगाने ते मुंबईहून चेन्नईला येतात आणि स्थानिक पोलिस निरीक्षक श्रुती व शिपाई काली यांच्या मदतीने या प्रकरणाची अनौपचारिक चौकशी सुरु करतात.
सुरुवातीस Margan movie राम्याच्या प्रियकरावर संशय घेत चौकशीला सुरुवात होते. पण चौकशी जसजशी पुढे सरकते, तसतसं प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत जातं. खुनी इतका चलाख आणि धूर्त असतो की, तो कोणताही ठोस पुरावा मागे ठेवत नाही. कथानकाच्या प्रत्येक वळणावर एक नवा ट्विस्ट असतो, जो प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडतो – "खरा खुनी नेमका कोण आहे?" या प्रश्नाचं उत्तर शेवटपर्यंत मिळत नाही, आणि जेव्हा मिळतं, तेव्हा ते इतकं धक्कादायक असतं की प्रेक्षक अवाक होऊन जातात.
या चित्रपटाला IMDb वर ६.८/१० अशी समाधानकारक रेटिंग मिळाली आहे. 'मारगन'ची एकूण वेळ २ तास १२ मिनिटांची असून, चित्रपटाचा वेग, पार्श्वसंगीत आणि अभिनय प्रेक्षकांवर प्रभाव टाकतो. विजय अँटनी यांनी मुख्य भूमिका साकारली असून, त्यांनी अत्यंत समर्पक अभिनय सादर केला आहे. त्यांच्यासोबत पी. समुथिरकानी, महानदी शंकर, विनोद सागर आणि रामचंद्रन धुरिराज यांच्याही भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत.क्राइम थ्रिलर, मर्डर मिस्ट्री आणि सस्पेन्स आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘मारगन’ हा एक परफेक्ट पर्याय ठरू शकतो. उत्कृष्ट मांडणी, प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी कथा आणि धक्कादायक शेवट यामुळे हा चित्रपट नक्कीच एकदा पाहण्याजोगा आहे.