तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Sarvatra Shiksha Samiti fraud ‘सर्व बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी’ अशी जाहिरात जिल्ह्यातील अग्रगण्य दैनिकांमध्ये ‘सर्वत्र शिक्षा समिती’च्या नावाने प्रसिद्ध करण्यात आली. सर्व शाळांमध्ये संस्कार शिक्षक आणि केंद्रप्रमुख या पदांसाठी म्हणून या समितीच्या वतीने ही पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माहितीनुसार बेरोजगार या संस्थेकडे 315 रुपये भरून नोकरीसाठी अर्ज करत होते. ‘सर्वत्र शिक्षा समिती’ ही एनजीओ अर्जासाठी 300 ते 400 रुपये आकारत असून, निवडीच्या वेळी प्रत्येकी 15,500 रुपये ‘सिक्युरिटी डिपॉझिट’ घेत होती. यामुळे अनेक युवकांची आर्थिक फसवणूक होत आहे.
या संदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार व अनिल हमदापुरे यांनी सर्वत्र शिक्षा समितीच्या उमरसरा कार्यालयात धडक दिली. त्या ठिकाणी होत असलेल्या आर्थिक प्रकाराचा जाब विचारत हा सर्व फसवणुकीचाच प्रकार असल्याचे निदर्शनास आणून दिले.यानंतर याबाबत शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांच्यासोबत संपर्क करून या प्रकरणात शिक्षण विभाग, सर्व शिक्षा अभियान विभाग झोपा काढत आहे का, असा प्रश्न अनिल हमदापुरे यांनी विचारला.
यात तत्काळ पावले न उचलल्यास शिक्षण विभागाच्या विरोधातच फसवणुकीचा गुन्हा दाखल करू, असा इशारा देताच शिक्षणाधिकाèयांनी आपल्या अधीनस्त अधिकाèयांना ‘सर्वत्र शिक्षा समिती’च्या कार्यालयात जाऊन सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.
या ठिकाणी बेरोजगारांची होणारी फसवणूक तत्काळ थांबावी, तसेच या संदर्भात तत्काळ खुलासा शिक्षण विभागाला सादर करावा, असे निर्देश सर्वत्र शिक्षा समितीलाही देण्यात आले.कोणत्याही बेरोजगाराने ‘सर्वत्र शिक्षण समिती’सोबत आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन पोलिसांकडे मनसेने केलेल्या तक्रारीनंतर शिक्षण विभागानेही पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केले आहे.
तक्रारीनुसार, ही एनजीओ दिल्ली येथे नोंदणीकृत असून, सांस्कृतिक मंत्रालयाकडून काही उपक्रमांना परवानगी मिळाल्याचा दावा त्यांच्याकडून केला आज होता. मात्र, ‘अशी’ शासकीय स्वरूपाची भरती करण्याची आणि आर्थिक व्यवहार करण्याची अधिकृत परवानगी या संस्थेला नाही.
तरीदेखील ही संस्था स्थानिक वृत्तपत्रांतून शासकीय स्वरूपाच्या जाहिराती देत उमेदवारांची दिशाभूल करत असून, शासकीय मान्यता असल्याचा भास निर्माण करत आहे. विशेष म्हणजे, या उमेदवारांना जिल्हा परिषद शाळांमध्ये वर्गखोल्या मागून बालसंस्कार या नावाने उपक्रम राबविण्यास सांगितले जात होते. हा उपक्रम कोणत्याही शासकीय मंजुरीशिवाय सुरू असल्याचे आता समोर आले आहे. या संदर्भात मनसेचे देवा शिवरामवार व अनिल हमदापूरे यांनी शिक्षण अधिकाèयांसोबत बेरोजगारांच्या फसवणुकी विरोधात पोलिस अपर अधीक्षक अशोक थोरात यांची भेट घेतली. यात तत्काळ कारवाईची मागणी शिक्षण विभागानेही पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
पोलिस अधीक्षकांनी चौकशी केली असता संबंधित ‘सर्वत्र शिक्षा समिती’ने हजारो बेरोजगारांकडून फसवणूकच केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ठाणेदार नरेंद्र रणधीर यांना यात तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
बेरोजगारांनी मानले आभार
या दरम्यान शेकडो बेरोजगार युवक उपस्थित होते. त्यांनी मनसेचे देवा शिवरामवार व अनिल हमदापुरे यांचे आभार मानले. याप्रसंगी मनसैनिक लकी छांगाणी, सोनू गुप्ता, तुषार चोडके, सौरभ अनसिंगकर प्रामुख्याने उपस्थित होते.