आपली बसच्या चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीस्वार तीन तरुणांना धडक दिली. accident या अपघातात चाकाखाली येऊन एका तरुणाचा मृत्यू झाला. यश व्यंकट पौनीकर (21) रा. लालगंज, मेहंदीबाग रोड असे मृताचे नाव आहे, तर इतर दोघे गंभीर जखमी आहेत. हर्ष राजेश मौदेकर (21) रा. लालगंज आणि अतुल घनश्याम कपाटे (22) रा. जुनी मंगळवारी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची ही भीषण घटना गिट्टीखदान ठाण्यांतर्गत सेमिनरी हिल्स परिसरात घडली. पोलिसांनी आरोपी बसचालक संतोष शिवराम उईके रा. शिवशक्तीनगर, पारडीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यश, हर्ष आणि अतुल हे तिघेही मित्र होते. बुधवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास तिघेही (एमएच-49/व्ही-8025) दुचाकीवर ट्रिपल सीट बसून टीव्ही टॉवर चौकातून एलएडी चौकाकडे जात होते. त्याच दरम्यान आपली बस (एमएच-49/बीझेड-2762) एलएडी चौकातून टीव्ही टॉवरकडे जात होती. बसचा चालक संतोष हा भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवीत होता. accident एलएडी चौकाजवळच त्याने समोरून येत असलेल्या मोटारसायकलला जबर धडक दिली. बसची गती अत्याधिक असल्याने वेळीच ब्रेक लागला नाही. मोटारसायकलचा पुढचा भाग बसमध्ये अडकल्याने तिघेही बऱ्याच दूरपर्यंत फरफटत गेले. त्याच दरम्यान चाकाखाली आल्याने यशचा मृत्यू झाला, तर हर्ष आणि अतुल हे गंभीर जखमी झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. आसपासचे नागरिक मदतीला धावले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. गिट्टीखदानचे ठाणेदार कैलाश देशमाने पथकासह घटनास्थळी पोहोचले. तिघांनाही उपचारार्थ मेयो रुग्णालयात रवाना केले. डॉक्टरांनी तपासून यशला मृत घोषित केले. हर्ष आणि अतुल यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपी बस चालक संतोषला अटक करून तपास सुरू केला आहे.