अक्षय- अरशद पुन्हा एकदा कोर्टरूममध्ये आमनेसामने

17 Sep 2025 12:34:09
मुंबई,
Jolly LLB 3 या वर्षातील सर्वात मोठ्या आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक, *जॉली एलएलबी ३* १९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सुभाष कपूर दिग्दर्शित ही कोर्टरूम कॉमेडी-ड्रामा पुन्हा एकदा हसवत-हसवत सामाजिक प्रश्नांना हात घालणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे यंदाच्या भागात बॉलिवूडचे दोन दमदार कलाकार – अक्षय कुमार आणि अरशद वारसी – पहिल्यांदाच या फ्रँचायझीत एकत्र झळकणार आहेत.
 
 
 

Jolly LLB 3  
चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग १५ सप्टेंबरपासूनच सुरू झाली असून, प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या बुकिंगमध्ये मोठ्या शहरांतील मल्टिप्लेक्समध्ये विशेष गर्दी पाहायला मिळत आहे. ट्रेड विश्लेषकांच्या अंदाजानुसार, जॉली एलएलबी ३ पहिल्याच दिवशी १० कोटींपासून १२ कोटी रुपयांपर्यंत कमाई करू शकतो. हा अंदाज अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या आकड्यांवरून लावण्यात आला असून, चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास वीकेंडमध्ये या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
 
 
पहिल्या जॉली एलएलबी मध्ये अरशद वारसीने एक मध्यमवर्गीय वकील साकारला होता, ज्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराला आव्हान दिले होते. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या भागात अक्षय कुमारने प्रमुख भूमिका बजावत एका मोठ्या प्रकरणाचा पाठपुरावा करत प्रेक्षकांच्या टाळ्याही मिळवल्या. तिसऱ्या भागात या दोन्ही पात्रांचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच या चित्रपटाभोवती प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
 
चित्रपटाच्या प्रोमोशनलाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर ट्रेलर आणि गाण्यांना भरभरून लाईक्स आणि शेअर्स मिळत आहेत. अक्षय कुमारसाठी हा चित्रपट अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण गेल्या काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळवले नव्हते. स्काय फोर्स आणि केसरी चॅप्टर २ या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतरही, त्यांची कमाई समाधानकारक नव्हती. त्यामुळे जॉली एलएलबी ३च्या यशाकडे केवळ प्रेक्षकच नाही, तर अक्षय कुमारचे करिअरही काहीसे डोलत आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
 
 
आता याचा पहिला वीकेंड कसा असतो, आणि प्रेक्षक चित्रपटाला कितपत स्वीकारतात, यावर या फ्रँचायझीच्या यशाची पुढील वाटचाल अवलंबून आहे. पण सध्या तरी प्रेक्षक आणि चित्रपट व्यावसायिकांमध्ये जॉली एलएलबी ३ बाबत उत्साहाचं वातावरण आहे.
Powered By Sangraha 9.0