एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने गोळीबार करणाऱ्या चार आरोपींना अटक

    दिनांक :17-Sep-2025
Total Views |
- पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सगल यांची माहिती
- आरोपींनी आखली लुटण्याची योजना
- चोरीच्या दुचाकीचा वापर, नंबर प्लेट बदलली

शैलेश भोयर
नागपूर, 
गोळीबार करण्यासाठी त्यांनी योजना आखली. चोरीच्या दुचाकीचा वापर केला. नंबर प्लेट बदलली. Accused arrested उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांना सुपारी दिली. लूटपाट केल्यानंतर चोरीचे वाहन सोडून दिले. गुन्हे शाखेच्या पथकाने एआय या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सगल यांनी प्रसार माध्यमांना दिली. सिमरजितसग संधू (40) रा. पंजाब, शेख हुसेन ऊर्फ जावेद शेख बशीर सवारे (37) रा. वाठोडा, अब्दुल नावेद अब्दुल जावेद (33) रा. बजेरिया आणि सय्यद जिशान सय्यद रहेमान (32) रा. जाफरनगर, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली. लुटण्याच्या योजनेत उत्तरप्रदेशातील सहभागी सहा आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असेही डॉ. सगल म्हणाले.
 
 
ATAk
 
Accused arrested  राजीव दीपानी (47) रा. मेकोसाबाग हे धान्य व्यापारी असून त्यांचे दहा नंबर पूल येथे स्वरूप ॲग्रो ट्रेडर्स या नावाने कार्यालय आहे. 10 सप्टेंबरला 7.45 वाजताच्या सुमारास ते घरी जात असताना कडबी चौक येथे काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन आरोपींनी त्यांच्या गाडीला लात मारली, तोंडावर स्प्रे मारला आणि आरोपीपैकी एकाने त्यांच्या पाठीवर तीन राऊंड फायर केले. त्यांच्याजवळ असलेली एअर बॅग जबरीने हिसकून आरोपींनी पळ काढला. या प्रकरणी जखमीची पत्नी श्रुती दीपानी (47) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
राजीव म्हण्ातो पन्नास लाख आणि आरोपी म्हण्ातात, 19 लाख पळविले. खरे काय ते तपासाअंती स्पष्ट होईल. घटनेच्या दिवशी राजीव दुकानातून 24 लाख रुपये घेऊन निघाला, तर कर्मचाऱ्यांनी 54 लाख रुपये राजीवच्या घरी पोहोचविले. राजीवने पन्नास लाखांचा हिशोब अजून दिलेला नाही. आरोपींनी लुटलेल्या 19 लाखांपैकी 15 लाख उत्तरप्रदेशातील आरोपी घेऊन गेले. उर्वरित रक्कम स्थानिक आरोपींजवळ होती. त्यापैकी एक लाख 80 हजार रुपये संधूने त्याच्या पत्नीच्या खात्यात टाकले. नंतर स्थानिक आरोपी हैदराबादकडे निघाले. त्यांनी एक लाख रुपये खर्च केले. प्रवास आणि भोजनालयावर उर्वरित रक्कम खर्च झाली, तर इतर सहा आरोपी उत्तरप्रदेशात रवाना झाले. आरोपींच्या अटकेसाठी पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनात सात पथके तैनात करण्यात आली. पोलिस पथकाने अत्याधुनिक तंत्रज्ञान (एआय) च्या मदतीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून दोन कार, तीन दुचाकी, देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, रोख 65 हजार, पाच मोबाईल फोन असा एकूण 21 लाख 11 हजार रुपये किमतीचा मुुद्देमाल जप्त करण्यात आला.
 
त्यांना सापडली अलीबाबाची गुहा
Accused arrested  चारही आरोपी हे ट्रान्सपोर्ट आणि लोनवर घेतलेल्या गाड्या उचलणे आणि वसुली करण्याचे काम करतात. आरोपी जावेद शेख हा एका ट्रान्सपोर्टमध्ये काम करतो. त्याच्या मालकाच्या नावे अमरावतीहून काही रक्कम राजीवच्या कार्यालयात आली. ती रक्कम घेण्यासाठी जावेद राजीवच्या कार्यालयात दोन महिन्यांपूर्वी गेला होता. तेव्हा त्याला अलीबाबाची गुहा सापडली. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार राजीवच्या कार्यालयात हवालाची रक्कम येते. त्याच वेळी त्याच्या डोक्यात लुटण्याची कल्पना आली.
 
अशी आखली योजना
Accused arrested  राजीवकडे अलीबाबाची गुहा असल्याची माहिती जावेदने सिमरजितसग संधू याला सांगितली. त्यांनी अब्दुल नावेद आणि सय्यद जिशानला बोलावून घेतले. चौघांनी मिळून योजना आखली. जावेद आणि संदू हे दोघेही ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात असल्याने त्यांची विविध प्रांतांत ओळख आहे. योजना आखल्यानंतर संदूने उत्तरप्रदेशातील आरोपींशी संपर्क साधला. सहा आरोपींना राजीवची सुपारी दिली. ठरल्याप्रमाणे 7 सप्टेंबरला युपीतील सहा आरोपी पिस्तूलसह आले. दहा आरोपींनी एका हॉटेलात बसून गोळीबार आणि लुटण्याची योजना आखली. वाडी हद्दीतून दोन दुचाकी चोरल्या. चोरीच्या दुचाकीनेच घटनास्थळी आले.