मुंबई,
Bollywood wishes Modi birthday भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७५ वर्षांचे झाले. १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातमधील वडनगर येथे जन्मलेल्या नरेंद्र मोदींनी गेली ११ वर्षे देशाचे नेतृत्व करत असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकीय क्षेत्रासह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनीही सोशल मीडियावरून मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंत अनेक कलाकारांनी पंतप्रधानांविषयी आपली कृतज्ञता आणि आदर व्यक्त केला आहे.
“सबका साथ, सबका विकास”
बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या खासदार असलेल्या कंगना रणौत यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले, “सबका साथ, सबका विकास” या मंत्राला आत्मसात करून देशाच्या विकासाच्या दिशेने सातत्याने वाटचाल करणारे, भारतमातांचे खरे सुपुत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” त्यांच्या या पोस्टने सोशल मीडियावर मोठीच चर्चा निर्माण केली आहे.
जुन्या आठवणींना उजाळा
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी एक चार मिनिटांचा व्हिडीओ शेअर करत मोदींसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. गुजरातचे मुख्यमंत्री असताना झालेल्या भेटीची आठवण सांगताना त्यांनी मोदींच्या फिटनेसचेही कौतुक केले. “प्रभू आपल्याला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभू दे. आपल्या नेतृत्वाखाली देशाने अजून अनेक टप्पे पार करावेत,” असे ते म्हणाले. त्यांच्या आईनेही मोदींसाठी आशीर्वाद दिल्याचे त्यांनी नमूद केले.अभिनेत्री व मथुरा लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार हेमा मालिनी यांनीही सोशल मीडियावरून मोदींना शुभेच्छा देत त्यांच्याशी असलेल्या ११ वर्षांच्या संबंधांचा उल्लेख केला. “मोदीजी, मी ११ वर्षांपासून आपल्या संपर्कात असून, आपल्याकडून सतत प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळाले आहे. मथुरेतील जनतेकडून आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा,” असे त्या म्हणाल्या.
स्वस्थ, आनंदी राहा
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील Bollywood wishes Modi birthday सुपरस्टार महेश बाबू यांनीही एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरून मोदींना शुभेच्छा दिल्या. “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपण नेहमी स्वस्थ, आनंदी राहा आणि आपल्या प्रेरणादायी नेतृत्वाने आम्हाला दिशादर्शन करत राहा,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.सिनेसृष्टीतील आणखी एक दिग्गज, नागार्जुन यांनी २०१४ मध्ये मोदींसोबत झालेल्या पहिल्या भेटीचे स्मरण करत एक फोटो आणि व्हिडीओ शेअर केला. “ती भेट प्रेरणादायी होती. तुमचं नेतृत्व, सौजन्य आणि जीवनातील शिकवण या सगळ्याने मला भारावून टाकलं. आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,” असे त्यांनी म्हटले.दरम्यान, अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी अहमदाबादमध्ये एक विशेष उपक्रमात सहभाग घेत पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेसोबत रक्तदान शिबिरात भाग घेतला. “मोदीजी युगपुरुष आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केले आहे. त्यांच्या प्रेरणेतून आम्हीही आज रक्तदान करत आहोत,” असे त्यांनी सांगितले. स्वतः विवेकनेही या शिबिरात रक्तदान केले.याशिवाय, अभिनेता परेश रावल यांनी “ईश्वर आपल्या आदरणीय पंतप्रधानांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य देवो,” अशी प्रार्थना केली. अभिनेता रितेश देशमुख यांनीही आपल्या शुभेच्छा देताना नरेंद्र मोदींना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, असे म्हटले. तर अभिनेता सोनू सूद यांनी लिहिले, “इतिहास त्यांचं स्मरण ठेवतो जे भविष्याला नवी दिशा देतात. मोदीजींना त्यांच्या दृढ नेतृत्वासाठी शुभेच्छा. त्यांचा प्रवास नेहमीच प्रेरणादायी ठरो.”पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त केवळ राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांकडूनही शुभेच्छांचा ओघ सुरू असून, देशभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे.