- आठ हजारांची स्वीकारली लाच
- हुडकेश्वर पोलिस ठाण्यातच कारवाई
नागपूर,
Bribe आठ हजार रुपयाची लाच स्वीकारताना पोलिस उपनिरीक्षक (प्रोबेशनरी) आणि हवालदारास लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) रंगेहात पकडले. आकाश साकोरे (28), शारदा भेरे- आलोटकर (40) अशी लाच स्वीकारणाऱ्यांची नावे आहेत. ही कारवाई बुधवारी सायंकाळच्या सुमारास हुडकेश्वर पोलिस ठाण्यात झाली. या कारवाईमुळे पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. आकाश हा प्रोबेशनरी पोलिस उपनिरीक्षक आहे. तर शारदा ही पोलिस हवालदार पदावर आहे. आकाश हा एक जानेवारी 2025 पासून हुडकेश्वर ठाण्यात नेमणुकीस आहे. तर शारदाला जवळपास चार वर्ष झालीत.

Bribe यातील तक्रारदाराला त्याच्या वडिलांचा अपघात झाल्याचा दावा करण्याकरिता लागणारी कागदपत्रे देण्याकरिता आरोपींनी आठ हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार हुडकेश्वर ठाण्यात पोहोचले. उपनिरीक्षक आणि हवालदार यांनी ठाण्यातच तक्रारदाराकडून आठ हजारांची लाच स्वीकारताच पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले. त्यांच्याकडून आठ हजार रुपये जप्त केले. दुसऱ्या पथकाने दोघांच्याही घराची झाडाझडती घेतली. मोबाईल जप्त केला असून तांत्रिक विश्लेषण करण्यात येणार आहे. पथकाने दोन्ही आरोपींविरुद्ध हुडकेश्वर ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.