कोणे एके काळी
स्वाती काळे (कोलारकर)
आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणावाराचे स्वतःचे खास अस्तित्व आहे. ओळख आहे आणि व्यक्तिमत्त्वदेखील आहे. वैदर्भीय संस्कृती आपल्याला प्रत्येक दिवस रसरशीतपणे जगायला शिकवते. होणारे सणवार, व्रतवैकल्ये म्हणजे आपल्या पूर्वजांनी केलेली पंचमहाभुतांची पूजा आणि खाद्यसंस्कृती म्हणजे आपण प्रेमाने दाखविलेला वैदर्भीय नैवेद्य. आपले वैदर्भीय सणवार आणि खाद्यसंस्कृती कायम एकमेकांना बिलगून उभे असतात. विदर्भाची खासियत म्हणजे विशिष्ट सणाला विशिष्ट पद्धतीचेच पदार्थ तयार केले जातात. अर्थात सणासुदीला बनवल्या जाणार्या पदार्थांच्या मागे श्रद्धा असतेच; त्याचबरोबर तो सण कोणत्या ऋतूत येतो आणि त्यावेळी शरीराला कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते, त्यावेळेस कोणते शेतात पिकते या सर्व गोष्टींचा सूक्ष्म विचारही यामागे असतो.
श्रावण मास म्हणजे सण-उत्सवांचा राजा. श्रावण म्हणजे श्रवणाचा उत्सव. प्रत्येक सण-उत्सव डोळ्यांनी टिपायचा, जिभेने रसास्वाद घ्यायचा आणि कानांनी ऐकायचा असतो. श्रावणात ऐकली जाणारी सोमवारची खुलभर दुधाची कहाणी विदर्भाच्या खाद्यसंस्कृतीचे मर्म आहे. एकदा काय होतं की, शिवभक्त राजा हुकूम फर्मावितो की, गाभारा प्रजेने दुधाने भरावा. प्रजा घाबरते. मुलंबाळं उपाशी राहतात. गावातलं सगळं दूध देवळात जाऊनही गाभारा भरत नाही. गावात एक म्हातारी असते. गाई-वासरांना चारा घालून ती देवळात येते. खुलभर दूध नैवेद्याला ठेवते; आणि काय आश्चर्य! संपूर्ण गाभारा दुधाने भरून जातो. राजाला आश्चर्य वाटते. म्हातारी म्हणते,
‘‘राजन! तू वासरांना, मुलांना उपाशी देवाला आवडलं नाही.’’
आपल्या भावी पिढीतील मुलाबाळांना सकस खाऊ घालणं हा आपल्या कुटुंबाचा धर्म आहे. आपल्या खाद्यसंस्कृतीचे मर्मही यातच आहे. नुकतेच बाप्पा आपल्या भेटीला येऊन गेले. विदर्भात बरेच जणांकडे एकादशीपासून गणपती स्थापनेच्या आदल्या दिवशीपर्यंत गणपतीचे नवरात्र असते आणि नंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची साग्रसंगीत स्थापना होते. रात्री नवरात्रीचे भजन चटपटीत चणाडाळीचा प्रसाद मिळतो. विदर्भात हरभर्याचे पीक जास्त असल्यामुळे हरभर्याच्या डाळीचा वापर जास्त प्रमाणात आहे. विदर्भात अगदी दीड दिवसांपासून एकवीस दिवसांपर्यंत गणपती उत्सव साजरा केला जातो. स्थापनेच्या दिवशी एकवीस तळलेले मोदक असतात. मत्स्यपुराणातदेखील मोदकाचा उल्लेख आहे. कोकणस्थ लोकांकडे उकडीचे मोदक असतात. सोबत एक मुरड करंजी असते. विदर्भात पिठीच्या करंज्या मुरड घालून करण्याची पद्धत आहे. करंजीला मुरड घालणे ही सुगरणीची कला आहे. घरी आलेल्या इष्टदेवतेने परत जाताना मुरडून मुरडून मागे पहावं यासाठी केलेली ही मुरड करंजी. गणपतीच्या निरोपावेळी आपुलकीची स्निग्धता टिकवून ठेवणारा दहीकाल्याचा नैवेद्य केला जातो.
ग्रामीण विदर्भातील चुली मातीच्या असतील, पण सणासुदीच्या पाहुणचारासाठी मनाची समृद्धी मात्र सोन्यारुप्याची असते. लगडलेली पहिली फळं, गाई-म्हशीचे दूध, विहिरीला लागलेलं पाणी, नवधान्याचा नैवेद्य शेतकरी राजा पहिल्यांदा देवाला आणि दारी आलेल्या पाहुण्याला अर्पण करतो. महालक्ष्मीचे नैवेद्याचं ताट शिवारातील तरारलेल्या दाण्यांनी, शेतमळ्यात नुकत्याच उगवलेल्या हिरव्यागार भाज्यांनी संपन्न असतं. केळीच्या हिरव्यागार पानावर मधोमध पांढरीशुभ्र भाताची मुद, त्यावर पिवळेधमक वरण, कढी, लोणकढ्या तुपाची सोडलेली धार, नेटका डावीकडे खोबर्याची चटणी, कोशिंबीर, पंचामृत, तळणाचा एखादा पदार्थ, शेवयांची किंवा गवल्याची खीर, रवा-बेसनाचा लाडू, उजवीकडे पिवळीधमक बटाट्याची भाजी, अळूची पातळ भाजी, वाटीत कटाची आमटी, एकावर एक रचलेल्या पुर्या, भरडा वडे, आंबील आणि त्यांच्या सोबतीला पोळ्यांची महाराणी पुरणपोळी असतेच असते. सोळा प्रकारच्या भाज्या असतात. सोळा आकडा महत्त्वाचा; कारण हिंदू संस्कृतीचे सोळा आहेत. होणारे संस्कार सोळा आहेत. घाटल्यामध्ये हमखास पडवळ असतं. कढीतही पडवळ टाकतात. त्याला ‘कथली’ म्हणतात. शेवटी सगळ्यांच्या हातात तांबूल ठेवतात. महालक्ष्मीच्या तळहाताला विडा समजल्या जातं. असं म्हणतात की, शंकराने नागवेलीला पृथ्वीवर जायला सांगितले; पण ती ढिम्म हलली नाही. शंकराने चिडून तिला पृथ्वीवर ढकलले. नंतर उ:शाप दिला की, प्रत्येक नागवेलीच्या पानांना अतिशय सन्मानाने वागविण्यात येईल. महालक्ष्मीला चिवडा, लाडू, शंकरपाळे, अनारसे असा स्वादिष्ट फुलोरा असतो. वर्हाडात बर्याच घरांमध्ये महालक्ष्मीप्रमाणे गणपतीलासुद्धा असा फुलोरा असतो. पापड्या, करंज्या, सांजोर्यांचं मनमोहक तोरण असतं. विदर्भात लाडवांना पक्वान्नांच्या यादीत वरचे स्थान आहे. बुंदीचे लाडू, बेसनाचे लाडू, रवा-बेसनाचे लाडू, डिंकाचे लाडू, अळिवाचे लाडू, तिळाचे लाडू असे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू वर्हाडात खाल्ले जातात. गणपतीचा अत्यंत प्रिय असा राघवदास लाडू पूर्वी रवाखव्याचा नसायचा. चण्याची डाळ भिजवून वाटून साजूक तुपात मंद आचेवर भाजायची. त्यात ओलं नारळ भरपूर घालायचं आणि साखरेच्या एकतारी पाकात हे लाडू वळायचे. जन्माष्टमीच्या ‘गोविंद’ लाडवानंतर गणपतीच्या महाप्रसादाला असलेल्या राघवदास लाडवामुळे सबंध कुटुंब गोड होतं. जन्माष्टमीचा काला घरोघरीचे पोहे, लोणचे, ज्वारीच्या लाह्या, दही, मीठ, साखर, हरभरा, शेंगदाणे, डाळिंब, वेगवेगळ्या प्रकारची फळे सर्व कालवून बनवला जातो. अतिशय साध्या पद्धतीने बनवलेला काला विदर्भाच्या सर्वधर्मसमभाव संस्कृतीचा पाया आहे. विदर्भाला लाभलेल्या आध्यात्मिक वारश्याचे प्रतीक आहे.
गजानन महाराज म्हणजे विदर्भाचे दैवत. त्यांच्या नैवेद्याकरिता भाकरी, अंबाडीची भाजी, झुणका, ठेचा, कांदा असे पदार्थ ताटात असतात. मात्र, नैवेद्याची भाकरी पुरणपोळीपेक्षा गोड लागते. महालक्ष्मी घरात आल्यावर किंवा नवरात्रीचे घट बसल्यावर पंचडाळींच्या खमंग वड्यांचा सुवास अख्ख्या पंचक्रोशीत पसरलेला असतो. पुरणपोळीबरोबर आपल्याकडे वडे आवश्यक समजले जातात. मटकी आणि बरबटी टाकल्यामुळे हे वडे फारच चविष्ट लागतात. पण फक्त वड्यांवरच अस्सल वैदर्भीय पाहुणचार संपत नाही. त्याबरोबर पाच भजी लागतातच. सणावारी पुरण केलं तर तळण लागणारच, अशी येथील परंपराच आहे. ओल्या गव्हाचा रवा काढून अतिशय निगुतीने केलेले गहुले, मालत्या, फणोले, मणी, नखुले, बोटवे हे वळीवंटाचे प्रकार हमखास सुणासुदीला कोठीघरातून बाहेर काढले जायचे. अजूनही काही घरांमध्ये हे प्रकार घरी करतात. लग्नकार्यात नववधूची ओटी भरण्यासाठीसुद्धा यांचा उपयोग होतो.
विदर्भातलं सावळं-गोजीरं आणि मऊसूत असतं. प्रेमाचं प्रतीक असतं. पूर्वी पाटा-वरवंट्याच्या खडबडीत सुरावरून लगेच कळायचं की पुरण कसं वाटलं जात आहे. कारण डाळिंब्या व्यवस्थित रगडण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागायचे. पारीमध्ये दुपटीने पुरण भरून मऊसूत पुरणपोळी हाताने झरझर पसरवण्यासाठी विदर्भाच्या सुगरणीचंच काळीज लागतं. पूर्वी घरोघरी पानामध्ये कढीची आणि तुपाची वेगवेगळी वाटी असायची. पुरणपोळीवर एवढे प्रेम आहे की, पोळ्याला बैलांनाही बाजरीच्या भाकरीबरोबर पुरणपोळी खाऊ घातली जाते.
महालक्ष्मीचा सर्वात महत्त्वाचा प्रसाद आंबिलीचा असतो. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळीकडे आंबील, गुळ आणि दूध हा मुख्य नैवेद्य असतो. ज्वारीच्या पिठापासून घार्या केल्या जातात. नागपंचमीच्या सणाला ज्वारीच्या लाह्या आणि फुटाण्याचा नैवेद्य हा अख्ख्या वर्हाडात दाखविला जातो. त्यादिवशी जेवणात दिंड असतात. शिरा-पुरी असते; पण भाजी चिरल्या जात नाहीत. चुलीवर तवा ठेवला जात नाही.
विदर्भातील स्त्री शक्तीचं रुपडं अतिशय लडिवाळ आणि लोभस आहे. भाद्रपदात पार्वतीचे माहेरपण महिनाभर घराघरात रुणझुणतं. पार्वती भुलाबाईच्या किंवा भुलज्याच्या रूपात शंकराला भुलवायला येते. भोडनी पौर्णिमेला भाद्रपदी बसणार्या बाहुल्या अश्विनी पौर्णिमेला उठतात. शेतात त्यांची माती विरघळली शेती चांगली पिकते, असा समज आहे.
गुढीपाडव्याच्या पाठोपाठ येणारी चैत्रगौर म्हणजे पार्वतीचे माहेरपणच. महिनाभर राहून वैशाख शुद्ध चतुर्थीला बोटव्याची म्हणजेच वळवटीची खीर आणि गुळाची मुरडपोळी खाऊन ती सासरी जाते. माहेरून सासरी जाताना माहेरवाशिणींना शेवयाची खीर कधी खाऊ घालत नाहीत. कारण लांब शेवयांसारखीच त्यांची भेट लांबेल, असा गोड समज विदर्भात म्हणून चैत्रगौरीलासुद्धा शेवयाची खीर कधी करत नाही. बोटवे आखूड त्यामुळे भेट लवकरच होईल, ही आशा माहेरच्यांना असते. म्हणून बोटव्याची खीर आणि पुन्हा लवकर भेटीला यावं म्हणून मुरडपोळी किंवा कानवला करतात.
चैत्रातल्या शुद्ध द्वादशीचा महादेवाचा उत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो. याला आमली किंवा आंबील बारस म्हणतात. यावेळी नवीन हरभरे आलेले गावातल्या महादेवाजवळ या दिवशी रोडग्याचा भंडारा असतो. हरभर्याची उसळ, आंबील, रोडगे असा भक्कम बेत असतो. वैशाखातल्या अक्षय्य तृतीयेला चिंचोणीचा फार मान असतो. गावच्या बाजारात भाजीवाली ओरडत असते, ‘गवला, कुचोला, खोबर्याची वाटी, सामान घ्या हो चिंचोणीसाठी‘ कुरडया, पापड, सांडया असे तळणीचे पदार्थ याच दिवशी वर्षाला पहिल्यांदा तळले जातात. आंब्याचा पहिला अक्षय्य तृतीयेला केला जातो. सवाष्ण किंवा मेहुणने रसाचा घास घेतल्याशिवाय घरी कोणीही जेवत नाही. आरोग्यदायी सुगंधी वाळा घालून कुंभदान केलं जातं.
चैत्र पौर्णिमेला होणार्या हनुमान जयंतीला ठिकठिकाणी गुळ खोबरे, गुळ फुटाणे, साखर फुटाणे वाटले जातात. आम्हा लहान मुलांचा हा अत्यंत लाडका खाऊ असायचा. हनुमान जयंतीच्या निमित्ताने विदर्भात अनेक भंडारे घरात काहीही नवं आलं की ‘नवं फेडणं’ आलंच. नवीन गहू आले तर रोडग्याचा भंडारा, ज्वारी घरात आली तर भाजी-भाकरीचे गावजेवण अशा समृद्ध कृषी संस्कृतीचे आपण वारसदार आहोत. विदर्भातले समृद्ध सणवार आणि त्या अनुषंगाने रुजत गेलेली खाद्यसंस्कृती यांचा संगम खरोखरीच अपूर्व असाच आहे. तो प्रत्यक्ष अनुभवायलाच हवा.