गोंदिया,
gondia-auto-driver-assault : सिव्हिल ड्रेसवर असलेल्या एका पोलिसाने ऑटो चालकाला मारहाण केल्याचा प्रकार शहरातील मनोहर चौकात २ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडला. रवीकुमार क्षीरसागर (४३), रा. गोरेगाव असे जखमी ऑटो चालकाचे नाव आहे.
ऑटो चालक रवीकुमार क्षीरसागर हा एमएच ३५, एएच ०१२८ क्रमांकाच्या ऑटोने मनोहर चौकातून प्रवासी घेऊन गोरेगावच्या दिशेने निघाला होता. यावेळी ऑटोला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एमएच ३५, एडी ५६७३ क्रमांकाच्या दुचाकीने धडक दिली. त्यानंतर ऑटो चालकाने ऑटो थांबवत दुचाकी चालक पोलिस कर्मचारी सचिन जगणित (३९), रा. पोलिस लाईन गोंदिया याला हटकले. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. याचे रुपांतर हाणामारीत झाले. दुचाकीचालक सचिन जगणित याने ऑटो चालक रवीकुमारला जबर मारहाण केली. यात तो जखमी झाला.
हा प्रकार रवीकुमारच्या सहकारी ऑटोचालकांना माहित होताच त्यांनी घटनास्थळ गाठून रवीकुमारला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. उपचारानंतर रवीकुमार व त्याच्या सहकार्यांनी गोंदिया शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. दुचाकीचालक सचिन जगणित यानेही चालकाविरोधात पोलिसात तक्रार केल्याची माहिती आहे. दरम्यान, गुन्हा नोंद करून दुचाकीचालकावर कारवाई न झाल्यास प्रवासी सेवा बंद ठेवण्याचा इशारा ऑटो चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश समुद्रे, विष्णू तिवारी, महेंद्र गडपायले, राजेंद्र ठाकूर, जमील कुरेशी, तौफीक शेख, हैदर शेख, गौतम डोंगरे यांनी दिला आहे.
माझ्या दुचाकीची ऑटोला धडक बसली नाही. वाहन ओलांडत असताना ऑटोचा पडदा दुचाकीच्या हॅण्डलमध्ये फसला. त्यामुळे मी दुचाकीसह खाली कोसळलो. ऑटो चालकाला समज दिली असता, त्याने मला शिवीगाळ केली. यात बाचाबाची झाल्याने ऑटोचालक खाली कोसळून जखमी झाला असावा.
-सचिन जगणित, पोलिस कर्मचारी