गडचिरोलीत सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा

24 Sep 2025 18:21:29
गडचिरोली,
Bachchu Kadu गडचिरोली जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी प्रहार संघटनेचे संस्थापक तथा आमदार बच्चू कडू यांनी आज गडचिरोली दौर्‍यादरम्यान विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेतून केली आहे. यावेळी फडणवीस सरकारवर जोरदार टीका करीत ओला दुष्काळ, शेतकर्‍यांची कर्जमाफी, जिल्ह्यातील विकासकामे आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून सरकारला धारेवर धरले.
 

Bachchu Kadu  
आमदार कडू म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात ओला दुष्काळ सर्वत्र दिसून येत आहे. तरीदेखील सरकारकडून केवळ पंचनाम्याचा खेळ सुरू आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकर्‍यांची तात्काळ कर्जमाफी व्हावी. जिल्ह्यातील उद्योगांबाबत बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधत म्हणाले की, उद्योगाच्या वल्गना करणार्‍या फडणवीस सरकारने आधी येथील आदिवासींच्या मूलभूत समस्या सोडवाव्यात. गडचिरोलीतील रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट असून मुख्यमंत्री स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही विकास कामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे ते म्हणाले. याशिवाय त्यांनी निवडणूक आयोगावर टीका करीत निवडणूक आयोग भाजपच्या हातातील बाहुले झाला आहे. यापुढे निवडणुका त्यांनी थेट भाजपच्या कार्यालयातूनच घ्याव्यात, अशी उपरोधिक टिप्पणी आमदार कडू यांनी केली.
या पत्रकार परिषदेला प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निखिल धार्मिक आणि उपजिल्हाध्यक्ष संकेत गड्डमवार उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0