नवीन निरीक्षणगृह आवश्यक सुविधांनी परिपूर्ण : विकास मीना

25 Sep 2025 19:44:59
तभा वृत्तसेवा यवतमाळ,
Vikas Meena district collector, जिल्ह्यातील नवीन निरीक्षणगृह बालकांसाठी आवश्यक सुविधांनी युक्त असून बालकांना आनंददायी आणि सुरक्षित वातावरण मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी विकास मीना यांनी व्यक्त केला. मुख्य जिल्हा न्यायाधीश नागेश नाव्हकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बाल न्याय यंत्रणेच्या त्रैमासिक आढावा बैठकीत ते बोलत होते.
 
 

Vikas Meena district collector, 
या बैठकीला जिल्हा प्रशासन, महिला व बालविकास, पोलिस, आरोग्य, शिक्षण अशा विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अधीक्षक गजानन जुमळे यांनी नवीन इमारतीबाबत सविस्तर माहिती दिल्यानंतर, जिल्हाधिकारी मीना यांनी इमारतीची पाहणी केली. उपलब्ध सुविधा, गरजा व भविष्यातील वापर याची सखोल तपासणी केली. राज्यातील पहिली सर्वसुविधायुक्त मॉडेल इमारत असलेली ही इमारत अत्यंत प्रशस्त असून येथे रिक्रिएशन हॉल, संगणक कक्ष, वाचनालय, इनडोअर गेम्स, चित्रकला, संगीत, व्यायाम व अन्य उपक्रमांसाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध आहे. बालकांना खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण, प्रशिक्षण, समुपदेशन, मनोरंजन व सर्वांगीण विकास साधता येईल.
 
 
इमारतीमध्ये सकारात्मक आणि आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी बालकांना आकर्षित करणारी निसर्गचित्रे, भित्तीपत्रके, प्रेरणादायी विचार व सुबक रंगसंगती यांची सजावट करण्यात आली आहे. नवीन सुविधांसाठी सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणा, बंकबेड, स्टडी टेबल, लायब्ररी स्टोरेज, प्रोजेक्टर, गिझर, वॉटरकूलर, खेळाचे साहित्य, संगीत वाद्य, व्यायाम साहित्य यांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
 
 
बाल न्याय अधिनियम अंतर्गत ही सुविधा 6 ते 18 वयोगटातील विधी संघर्षग्रस्त व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी कार्यान्वित होणार आहे. येथे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण व समुपदेशन यांसारख्या मूलभूत सेवा पुरविल्या जातील.
बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, बाल न्याय मंडळ अध्यक्ष शर्वरी जोशी, सदस्य अ‍ॅड. काजळ कावरे, राजू भगत, अ‍ॅड. लीना आदे, शिक्षणाधिकारी मडावी व शेंडगे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विशाल जाधव, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, विधी व परीविक्षा अधिकारी महेश हळदे, समुपदेशक पूजा राठोड, सखी वन स्टॉप सेंटर प्रशासक मीनल जगताप आणि कर्मचारी उपस्थित होते.
याशिवाय, या नवीन प्रशासकीय संकुलात लवकरच बाल न्याय मंडळ, शासकीय निरीक्षणगृह, बालगृह व बाल कल्याण समितीचे कार्यालय देखील स्थलांतरित होणार आहे.
Powered By Sangraha 9.0