गोदावरीच्या काठावरील शेती धोक्यात

26 Sep 2025 17:49:23
सिरोंचा,
godavari river erosion, गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील अंकिसा परिसरातील शेतकरी मागील काही वर्षांपासून गंभीर संकटाचा सामना करत आहेत. गावाजवळून वाहणारी गोदावरी नदी आता या शेतकर्‍यांची शत्रू ठरत असून नदीकाठची सुपीक शेती अक्षरशः खरडून जात आहे.स्थानिक शेतकर्‍यांच्या मते गोदावरी नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे कडेला असलेली शेती सतत वाहून जात असून शेतीचे मोठे क्षेत्र आता नदीदोस्त होत चालले आहे. त्यामुळे आयुष्यभर जोपासलेली शेती आता शेतकर्‍यांना गमवावी लागत आहे.
 

godavari river erosion, 
मागील दोन वर्षांपूर्वी आलेल्या मोठ्या पुरामुळे संपूर्ण अंकिसा परिसरातील शेतीत मोठ्या प्रमाणावर रेती साचली होती. ही रेती आजही शेतांमध्ये असून त्यामुळे पिके घेणे अशक्य झाले आहे. काही शेतकरी प्रयत्नपूर्वक शेती सुरू करण्याचा प्रयत्न करत असले तरी, जमिनीची उर्वरकता संपुष्टात आल्याने त्यांना तोटा सोसावा लागत आहे.
नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीकडे शासनाने योग्य लक्ष दिले नाही. शेती वाहून जात असताना आम्हाला कुठलीही मदत किंवा पुनर्वसन योजना मिळालेली नसल्याचे येथील शेतकर्‍यांनी सांगितले आहे. या गंभीर परिस्थितीवर स्थानिक शेतकरी खासदार व आमदार यांचे लक्ष वेधत आहेत. नदीकाठावर आवश्यक संरक्षक बंधारे उभारून शेतकर्‍यांचे जीवन वाचवावे. तसेच रेतीग्रस्त जमिनीचे पुनर्वसन करण्यासाठी शासकीय मदत तातडीने मिळावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. गोदावरी नदीच्या या सततच्या धोक्यामुळे अंकिसा व परिसरातील शेतकर्‍यांचे भविष्य संकटात आले आहे. शासनाने तत्काळ लक्ष घालून या शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Powered By Sangraha 9.0