सामान्यांची असामान्य कर्तबगारी

26 Sep 2025 18:57:46
विश्वसंचार
मल्हार कृष्ण गोखले
Pakistan attack दुसर्‍या महायुद्धात जर्मनीने अनेक ठिकाणी आपले छत्रीधारी सैनिक उतरवले होते. प्रत्यक्ष युद्ध आघाडीच्या मागे लोकांमध्ये जायचे. महत्त्वाचे पूल, रेल्वे स्थानके, बंदरे, धावपट्ट्या, व्यापारी केंद्रे अशा ठिकाणी घातपाती कृत्ये घडवून आणायची. लोकांचे मनोधैर्य खच्ची करायचे, असे काम या छत्रीधारी सैनिकांवर सोपवलेले होते. एकंदरीत अनुभव आला की, लोक फार सावध होते.त्यामुळे बहुतेक छत्रीधारी हे ताबडतोब किंवा फार तर एक-दोन दिवसांतच पकडले गेले. जर्मनीचा हा धडा बहुधा पाकिस्तानच्या लक्षातच आला नाही; किंबहुना इतिहासापासून कोणताही धडा घ्याचाच नाही, असेच पाकिस्तानने ठरवलेले असावे किंवा आपण सहजपणे भारताला चारी मुंड्या चीत करू शकतो, ही घमेंड पाकिस्तानच्या शहाणपणावर मात असावी.
 
 
pak-attack1
 
१ सप्टेंबर १९६५ या दिवशी पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. १९६२ साली चीनने भारताच्या शांततावादी नेत्याला शेंडी लावून जसे घवघवीत यश मिळवले, तसेच आपल्यालाही जमेल, असे बहुधा पाकला वाटले. पण आताचा भारताचा नेता वेगळ्या तब्येतीचा होता. तो ताठपणे उभा राहिला आणि त्याच्या एका हांकेसरशी वरून दुभंगलेला दिसणारा अवघा भारत उदासीन भासणारा समाज नि सदैव भांडत बसणारे सगळे राजकीय पक्ष एकवटले. दिल्ली शहरात पंजाबी लोकांची वस्ती पुष्कळ आहे. युद्ध सुरू होताच त्यांनी लुधियाना, अंबाला, अमृतसर इत्यादी युद्धग्रस्त भागातल्या आपल्या नातेवाईकांना दिल्लीत बोलावले. पण कुणीही आपले घर सोडून आले नाही.
 
 
रेवाडी नावाच्या सरहद्दीवरच्या गावाची कथा ऐका. पाकिस्तानी छत्रीधारी सैनिक गटागटाने गावात उतरले. गावाच्या आसपास सर्वत्र ऊस लावलेला होता. पुरुषभर उंच वाढलेल्या उसात सहजपणे लपता येते, या हिशेबाने पाकिस्तानी विमानांनी छत्रीधारींना तिथे उतरवले. शेतकर्‍यांनी त्यांना उतरताना पाहिले. आता काय करायचे? या छत्रीधारींकडे पिस्तुले असणार; हातबॉम्ब असणार. आपल्याकडे तर फक्त लाठ्या-काठ्या आहेत. फार तर कृपाणे आहेत. मग काय करायचे? पळून जायचे? हॅट! ही पंजाबची अवलाद आहे. या कमअस्सल पाकिस्तान्यांना कोण घाबरतो!
 
 
Pakistan attack एका शेतकर्‍याने सरळ आपले शेतच पेटवून दिले. दुसर्‍या शेतात, एक भाऊ बुलडोझर घेऊन शेतात घुसला नि दुसर्‍याने धडपडत बाहेर येणार्‍या छत्रीधारींना बडवून काढले. कुणी कृपाण वापरले. कुणी लाठी वापरली. कुणी लाथाबुक्क्यांनी तुडवले. एक शेतकरी विहिरीवर उभा होता. अचानक समोर पाक सैनिक दिसताच अनावर संतापाने त्याने हातातली बादलीच फेकून मारली. पाकिस्तानी छत्रीधारी हे प्रशिक्षित सैनिक होते. ते हत्यारबंद होते. त्यामुळे आपले अनेक शेतकरी जखमी झाले. काही ठारसुद्धा झाले. पण लाठ्या-काठ्या-कृपाणे नि हात-पाय वापरून त्यांनी एकूण एक छत्रीधारी पकडून दिला. नंतर पत्रकारांनी या गावाला भेट दिली. शेते पेटवून दिल्यामुळे पिकाचे झाले नाही का? या प्रश्नावर आपले रुंद मनगट उंच करून दाखवीत एक शेतकरी म्हणाला, ‘आमच्या मनगटात वाटेल तितके श्रम करण्याची हिंमत आहे. ऊस काय, पुन्हा लावता येईल. पण गनीम मात्र मुळापासून उखडून काढलाच पाहिजे. ही आहे भारताची अस्मिता. ती जागी करण्यासाठी कुणीतरी सामर्थ्यवान नेता लागतो, एवढे मात्र खरे.
 
 
‘चपळांग मोठे महाविद्युल्लतेपरी’
वरील वर्णन समर्थांनी आपल्या मारुती स्तोत्रात केले आहे. हनुमंत हा महाबलाढ्य आहे, पण त्याचे अंग अवजड नाही, तर विजेसारखे चपळ आहे. युरोपच्या इतिहासात नेहमी गोलायथ आणि डेव्हिड यांचे उदाहरण दिले जाते. गोलायथ हा अत्यंत बलवान होता. आपल्या गदेने त्याने भल्याभल्यांना पाणी पाजले होते. डेव्हिड हा अंगाबांध्याने गोलायथपेक्षा होता, पण त्याच्या हातात गोफण होती. डेव्हिडने गोलायथची गदा स्वतःपर्यंत पोचूच दिली नाही. उलट डेव्हिडच्या गोफणीतून सणाणून सुटलेले आहे. अचूकपणे गोलायथच्या मर्मी बसत होते. अखेर गोलायथ ठार झाला.
 
 
बाबराच्या तोफखान्याने राजपुतांच्या अवजड गजदळाचा चक्काचूर केला. पण शिवछत्रपती आणि बाजीराव यांच्या चपळ घोडदळाने सुलतानांच्या तोफखान्याला निरुपयोगी ठरवले. शिवछत्रपतींची गनिमी पथके तोफखाने सुरू होण्यापूर्वीच त्यांच्यावर तुटून पडून, कापून, मारून, लुटून पसार होत तर बाजीरावाचे घोडदळ तोफखान्याचे गोळे जिथपर्यंत पोचत, तेवढे अंतर सोडून त्याच्या पलीकडून सुलतानी फौजांना गराडा घालून बसत असे. बाजीरावाच्या या युक्तीने निजामाचे प्रचंड सैन्य, मोठा तोफखाना दिमतीला असून काहीही करू शकले नाही.
 
 
१९६५ साली Pakistan attack पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. एफ-८६ सेबरजेट ही त्यावेळची अत्याधुनिक विमाने अमेरिकेने पुरवलेली होती. त्यांच्या जोरावर भारतीय प्रदेश भाजून काढीत दिल्ली जिंकू, अशी खुषीची गाजरे पाकिस्तानचा लष्करशहा जनरल महंमद आयुबखान खात होता. अमेरिकेने पाकला रडार यंत्रणा नि सर्व विमानतळांचा आपापसात संपर्क राखणारी दळणवळण यंत्रणाही दिली होती. या यंत्रणेमुळे पाक हवाई दल अधिकारी केवळ पाकिस्तानी नव्हे, तर भारताच्या कोणत्याही विभागातील नभांगणाचा वेध घेऊ शकत होते. आज ‘गुगल अर्थ’मुळे कोणीही जगाच्या कोणत्याही भागातले कोणतेही ठिकाण सहजपणे पाहू शकतो. १९६५ साली ही रडार यंत्रणा अद्भुत मानली जात होती; त्यात एक दोष होताच. ही रडार यंत्रणा अति उंचीवरील विमानयुद्धासाठी बनवली गेल्यामुळे तिला ४० हजार फुटांखालचे दिसत नसे.
 
 
प्रतिकूल परिस्थितीत अवाढव्य सेबरजेटस् आणि भारताची चिमुकली नॅटस् यांचे द्वंद्व सुरू झाले. हे विषम द्वंद्व होते. अवाढव्य राक्षस आणि ‘नेटका सडपातळू’ असणारा हनुमंत अवाढव्य राक्षसासारखा अफजलख ान आणि गोटीबंद शरीराचे शिवराय उंच धिप्पाड गोलायथ आणि पोरगा डेव्हिड यांच्या द्वंद्वाइतकेच हे विषम द्वंद्व होते आणि अखेर बाजी नॅटस्नी मारली! नॅट एक विशिष्ट प्रकारची माशी. अवजड धूड असणार्‍या एफ-८६ सेबरजेटपुढे नॅट खरोखरच माशीसारखे दिसायचे. पण त्याच्या या लहानपणातच त्याचे सामर्थ्य होते. पाकिस्तानी रडारना ४० हजार फुटांखालचे दिसत नव्हते तर या नॅटनी २० हजार फुटांवरून उड्डाणे करून पाकिस्तानी विमानतळ भाजून काढले. अनेक सेबरजेटस् धावपट्टीवरच खतम केली. आकाशात समोरासमोर लढाई करताना सेबरजेटनी साईडविंडर्स क्षेपणास्त्रे नॅट लिलया चुकवू शकत होते. छोटे असल्यामुळे आकाशात वाटेल तंशी वळणे घेणे, वर किंवा खाली हव्या तशा सुळकांड्या मारणे त्यांना सहज शक्य होते. अवजड सेबरजेटस्नी ते जमणे अर्थातच शक्य नव्हते.
 
 
१ सप्टेंबर १९६५ या दिवशी Pakistan attack पाकने भारतावर आक्रमण केले. त्या अगोदरपासूनच सेबरजेट विमानांचा प्रचंड गवगवा चालू होता. दोनच दिवसांत म्हणजे ३ सप्टेंबर १९६५ रोजी भारताचा स्क्वाड्रन लीडर ट्रेव्हर कीलर याने पंजाबमधील छांब भागात समोरासमोरच्या लढाईत आपल्या नॅटमधून पहिले सेबरजेट पाडले आणि त्या क्षणी सेबरजेटची दहशत संपली. भारतातली पोरेसोरेसुद्धा नॅटचे गिर्‍हाईक या शब्दांत सेबरजेटची टवाळी उडवू लागली.
 
(लेखक प्रसिद्ध स्तंभलेखक आहेत.)
७२०८५५५४५८

 
Powered By Sangraha 9.0