वर्धा,
Cannabis Trafficking : स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने बोरगाव (मेघे) परिसरात सापळा रचून दुचाकीने गांजाची तस्करी करून विक्री करणार्या इसमासह अल्पवयीन मुलाला अटक केली. त्यांच्या ताब्यातून दुचाकी, दोन मोबाईल, गांजा, असा १ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणार्या गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिले आहे. गुरुवार २५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. गोपनीय माहितीच्या आधारे वायगाव (नि.) ते वर्धा मार्गावर बोरगाव (मेघे) येथे सापळा रचून सुधांशु रामटेके (२०) रा. सिद्धार्थनगर बोरगाव (मेघे) व त्याचा अल्पवयीन सहकारी याच्यावर छापा टाकला. गांजा त्यांनी शहबाज चांद शेख रा. झाकीर हुसेन कॉलनी याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. त्यांच्या ताब्यातून १ किलो १०७ ग्रॅम गांजा, दोन मोबाईल, दुचाकी, असा १ लाख ५७ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित, गजानन दरणे, अभिषेक नाईक यांनी केली आहे.