श्री माता महाकाली महोत्सवाला थाटात सुरुवात

27 Sep 2025 22:18:10
चंद्रपूर, 
Shri Mata Mahakali Festival : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने आयोजित माता महाकाली महोत्सवाची पालखी सोहळा आणि श्री माता महाकालीच्या प्रतिष्ठापनेने थाटात सुरुवात करण्यात आली. यावेळी दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. प्रतिष्ठापनेनंतर मातेची महाआरती करीत मान्यवरांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.
 
 
k
 
 
यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समितीचे अध्यक्ष आ. जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक सदर्शन मुमक्का, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, तहसीलदार विजय पवार, कल्याणी जोरगेवार, मनीष महाराज, श्याम धोपटे, प्रा. प्रमोद कातकर, विश्वस्त सुनील महाकाले, राजू शास्त्रकार, अजय वैरागडे, जयश्री कापसे, भाजपा महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार आदी उपस्थित होते.
 
 
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी जैन मंदिरातून माता महाकालीच्या पालखी सह भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात आ. जोरगेवार सहपरिवार सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची उपस्थिती होती. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही शोभायात्रा महाकाली मंदिरात पोहोचली. त्यानंतर महोत्सव पंडालात महाकाली मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाआरती व महाकाली महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
 
 
यानंतर नवरात्रोत्सव दरम्यान जन्मलेल्या कन्यारत्नांना मान्यवरांच्या हस्ते चांदीची नाणी देण्यात आली. तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या संस्थांचा सत्कार करण्यात आला. आरोग्य शिबिर व चित्रकला स्पर्धेचे उद्घाटनही यावेळी पार पडले. दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी कन्यापूजन आणि भोजन तसेच सुहागन महिलांना बांगड्या भरून देण्यात आल्या.
 
 
यावेळी आ. जोरगेवार म्हणाले की, महाकाली मातेच्या आशीर्वादाने हा महोत्सव केवळ श्रद्धेचा उत्सव न राहता समाजसेवेचे व्रत बनला आहे. धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रमांना महत्त्व देणे, ही आपली संस्कृती आहे. या परंपरेला पुढच्या पिढीकडे पोहोचवणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे.
 
उद्याचे कार्यक्रम
 
 
रविवारी सुप्रसिद्ध गायक सवई भट आपल्या सुरमधुर भक्तीगीतातील मेजवानी सादर करणार आहेत. सकाळच्या आरतीनंतर 11 वाजता ‘जागर कवितेचा’ या महिलांच्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 1 वाजता ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने 999 ज्येष्ठ मायमाऊलींचा सन्मान करण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता स्थानिक कलावंतांचा नृत्य जल्लोष कार्यक्रम पार पडणार असून, सायंकाळी 7 वाजता इंडियन आयडल प्रसिद्ध गायक सवई भट यांच्या भक्ती संगीत कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे.
Powered By Sangraha 9.0