शेतात वीज पडून तीन बैलांचा मृत्यू

27 Sep 2025 21:47:55
गिरड, 
death-of-bulls-khandala : समुद्रपूर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी खंडाळा शिवारात शेतामध्ये चरत असलेल्या बैलांवर वीज पडून तीन बैलांचा मृत्यू झाला. यामुळे शेतकर्‍याचे जवळपास २ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
 
 
 
k
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास खंडाळा येथील शेतकरी संदीप झाडे यांचे तीन बैल शेतात चरत होते. यावेळी अचानक विजेच्या कडकडाटासह सुरू झालेल्या जोरदार पावसात चरत असलेल्या बैलांवर वीज पडली. यात तिन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. शेतकरी संदीप झाडे यांनी वर्षभरापूर्वीच १ लाख ७५ हजार रुपये किमतीची बैलजोडी व १ लाख रुपये किमतीचा १ बैल असे तिन्ही बैल २ लाख ७५ हजार रुपयात खरेदी केले होते. त्यांच्याकडे वडिलांच्या नावे ३ एक शेती असून ते गावातील इतर शेतकर्‍यांकडून भाडेतत्त्वावर शेती करून येणार्‍या उत्पादनातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. अचानक बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
 
 
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार कपिल हाटकर यांनी तलाठी गजानन ठाकरे यांना पंचनामा करण्याच्या सूचना केल्या तर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी अरुण तुराळे यांनी शवविच्छेदन केले. झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकरी संदीप झाडे यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0