दीक्षाभूमीवर आंतरराष्ट्रीय धम्म परिषद

27 Sep 2025 20:58:52
नागपूर, 
Deekshabhoomi-Surei Sasai : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता दीक्षाभूमी येथे आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला जपान, मलेशिया, श्रीलंका आणि थायलंडचे प्रतिनिधी येणार आहेत, अशी माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी प्रसार माध्यमांना दिली.
 
 
dikshabhumi
 
 
ससाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या परिषदेला जपान, मलेशिया, थायलंडच्या प्रतिनिधींसह अ. भा. धम्मसेनेचे सरचिटणीस डॉ. ए. नथिप्रकाशम (तामिळनाडू), जी. पांडियन, डॉ. भारती प्रभू, के. संपत, अंबुरोज, अंबू धसन, सी. बाबू, मणी, शेट्टी, आनंद वेलू, मगऊ पासगा, भंते मौर्य बुद्ध, भंते प्रकाश, भंते आर्यब्रह्मा, राहुल आनंद उपस्थित राहतील.
 
 
 
धम्म परिषदेची माहिती देताना ससाई म्हणाले, सम्राट अशोकाच्या काळात बुद्ध धम्माची प्रगती झाली. तथागत गौतम बुद्धांच्या प्रज्ञा, शील आणि करुणेच्या शिकवणीमुळे मानवतावादी आणि समतावादी धम्म जगभरात पसरला. बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‌‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म‌’ हा ग्रंथ लिहून बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान आणि गौतम बुद्धांच्या जीवनावर प्रकाश टाकला. आजच्या काळातही बौद्ध धम्माची तत्त्वे भारतीय लोकशाही आणि कायद्याशी सुसंगत आहेत, ज्यामुळे ती दैनंदिन जीवनातही उपयुक्त ठरतात. या परिषदेत धम्माची शिकवण आणि प्रगती या विषयावर मान्यवर मार्गदर्शन करतील. धम्माविषयी भंते तसेच उपासक, उपासिकांची कर्तव्ये आणि जबाबदारी तसेच विदेशात धम्माचा वाढता प्रसार आणि तेथील पद्धत, श्रामणेर सोहळा, विचारांचे आदानप्रदान आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन होणार आहे. धम्म परिषदेनंतर बुद्ध व भीम गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येईल. या कार्यक्रमात अंगुलिमाल, आम्रपाली यांच्यावर आधारित गीते, नाटके सादर करण्यात येणार आहेत.
Powered By Sangraha 9.0