HBOच्या ‘हॅरी पॉटर रीबूट’ मालिकेत वोल्डेमॉर्टसाठी महिला कलाकार?

27 Sep 2025 05:07:22
मुंबई
Harry Potter reboot HBO जगभरातील सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या आणि लोकप्रिय ठरलेल्या पुस्तकांमध्ये जे.के. रोलिंग यांची हॅरी पॉटर मालिका अग्रस्थानी आहे. या कादंबऱ्यांवर आधारित चित्रपट मालिकेनेही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. अशा या विश्वातील चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे – HBO या प्रसिद्ध नेटवर्कने हॅरी पॉटर पुस्तकांवर आधारित एक नवीन वेब सिरीज तयार करण्याची घोषणा केली आहे. या मालिकेचं नाव ‘हॅरी पॉटर रीबूट’ असून, ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि महागडी सिरीज असल्याचं सांगितलं जात आहे.
 

Harry Potter reboot HBO 
मालिकेच्या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि आनंद होता. पात्रांच्या कास्टिंगनंतर चाहत्यांनी देखील उत्साहाने स्वागत केलं. मात्र आता या आनंदावर विरजण घालणारी बातमी समोर आली आहे – रिपोर्ट्सनुसार, मालिकेतील मुख्य खलनायक लॉर्ड वोल्डेमॉर्ट या भूमिकेसाठी निर्माते महिला कलाकारालाही विचार करत आहेत.
 
 
वोल्डेमॉर्टसाठी पुरुष आणि महिला कलाकारांचे ऑडिशन्स
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘हॅरी पॉटर रीबूट’चे निर्माते वोल्डेमॉर्ट या भूमिकेसाठी पुरुषासोबतच एका महिला कलाकाराचेही ऑडिशन घेत आहेत. ही माहिती समोर आल्यानंतर हॅरी पॉटरच्या कट्टर चाहत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पुस्तकांमध्ये वोल्डेमॉर्ट हे पात्र स्पष्टपणे पुरुष आहे आणि चित्रपट मालिकेत ही भूमिका Ralph Fiennes या दिग्गज अभिनेत्याने गाजवली होती.चाहत्यांना हे पचनी पडलेले नाही की, ज्या मालिकेने पुस्तकांशी प्रामाणिक राहण्याचा दावा केला होता, तीच मालिका आता मूळ कथेपासून विचलित का होते आहे. "जर शो पूर्णपणे पुस्तकांवर आधारित आहे, तर मग मूळ पात्रांच्या लिंगात बदल का?" असा सवाल अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे.
 
 
 
चाहत्यांचा संताप, सोशल मीडियावर नाराजी
ही बातमी समोर येताच ट्विटर, रेडिट, आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. “हॅरी पॉटर आमच्या लहानपणाचा भाग आहे. त्याच्यात असा बदल बघणं त्रासदायक आहे”, “वोल्डेमॉर्ट एक महिला? हे कुठे तरी थांबायला हवं”, अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर उमटत आहेत.
 
 
 
निर्मात्यांचे क्रिएटिव्ह फ्रीडमचे समर्थन
यावर अद्याप HBO किंवा निर्मात्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र इंडस्ट्रीतल्या काही सूत्रांच्या मते, निर्माते या वेब सिरीजमध्ये काही आधुनिक बदल घडवून आणण्याच्या विचारात आहेत, जेणेकरून नवीन पिढीही हॅरी पॉटरच्या जगात आकर्षित होईल. ‘क्रिएटिव्ह फ्रीडम’ या नावाखाली होणाऱ्या बदलांना मात्र पारंपरिक चाहत्यांकडून विरोध होत आहे.
Powered By Sangraha 9.0