३५० वर्षांची अनोखी नवरात्र उपवास परंपरा...

27 Sep 2025 06:46:51
सातारा,
Pandhe village Satara सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील पांडे गावातील नवरात्र उपवासाची परंपरा देशभरातील धार्मिक उत्सवांमध्ये वेगळीच ओळख निर्माण करत आहे. गेल्या तब्बल ३५० वर्षांपासून या गावात नऊ दिवस आणि नऊ रात्री जमिनीवर न बसता केवळ उभे राहून उपवास करण्याचा अनोखा व्रत साजरा केला जातो. हा व्रत फक्त उभे राहण्यापुरता मर्यादित नसून, त्यासोबतच अनेक कडक नियमांचे पालनही या काळात अत्यंत काटेकोरपणे केले जाते.
 

Pandhe village Satara  
नवरात्रच्या घटस्थापनेपासून या व्रताची सुरुवात होते. गावातील लोक त्यांच्या आराध्य दैवत काळभैरवनाथाला नवस बोलतात आणि नवसपूर्तीकरिता व्रतस्थ व्यक्ती काळभैरवनाथाच्या मंदिर परिसरातच उपवास पूर्ण करतो. या व्रताची विशेषता अशी की, व्रतस्थाला नऊ दिवस तसेच नऊ रात्री जमिनीवर बसण्यास किंवा झोपण्यास परवानगी नाही. विश्रांतीसाठी मंदिरात खास झोपाळ्याची व्यवस्था असते, जिथे व्रतस्थ अर्धवट अवस्थेत एक पाय जमिनीवर ठेवून आणि दुसरा पाय झोपाळ्यावर ठेवून विश्रांती घेतो. चालताना किंवा उभे राहताना फक्त काठीचा आधार घेणे बंधनकारक आहे.
 
 
उपवासाच्या काळात व्रतस्थाला आहार, वेशभूषा आणि वर्तन या सर्व बाबतीत कठोर नियमांचे पालन करावे लागते. या काळात तिखट, मीठ, तेलकट पदार्थांचे सेवन पूर्णपणे टाळले जाते. तसेच व्रतस्थ पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान करतो आणि पायात चप्पल न घालता काठीचा आधार घेऊन गावात सकाळ-संध्याकाळ प्रदक्षिणा करतो. या व्रताचे महत्त्व एवढे मोठे आहे की, कामासाठी गावाबाहेर गेलेले पुरुषही या काळासाठी खास गावी परत येऊन उपवास पाळतात.पांडे गावातील ही परंपरा केवळ धार्मिक कडकपणा दाखवण्यापुरती मर्यादित नाही, तर ती सामाजिक एकात्मता आणि सर्वधर्म समभाव यांचाही अनोखा संदेश देते, असे स्थानिक हेमंत जाधव यांनी सांगितले. गावात कोणत्याही जाती-धर्माचे लोक हे व्रत करत असल्याने गावात सलोखा आणि मैत्रीचे वातावरण कायम राहते. पूर्वी या कठोर उपवासात महिला देखील पुरुषांप्रमाणे सहभागी होत होत्या, मात्र सध्याच्या काळात मुख्यत्वे पुरुषच या परंपरेचे पालन करत आहेत.महाराष्ट्रातील नवरात्र व्रत परंपरांमध्ये विविध प्रकार पाहायला मिळतात, पण सातारा जिल्ह्यातील पांडे गावाची ही ३५० वर्षांची कडक आणि अनोखी परंपरा भक्ती आणि सामाजिक एकतेचा अद्भुत संगम आहे, जो अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.
Powered By Sangraha 9.0