वॉशिंग्टन
Hurricane Humberto अटलांटिक महासागरात उठलेल्या अत्यंत भीषण हम्बर्टो वादळाने अमेरिकेच्या दक्षिण किनारपट्टीस गंभीर इशारा दिला आहे. या वादळाची श्रेणी ५ मध्ये नोंद करण्यात आली असून, सध्या हे वादळ ताशी सुमारे २२५ किमी वेगाने पुढे सरकत आहे. राष्ट्रीय वादळ व्यवस्थापन केंद्रानुसार हे वादळ प्रचंड वेगाने समुद्रातून अमेरिकेकडे सरकत असून, त्याच्या वाटेत येणाऱ्या सर्व वस्तू आणि परिसर उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.
हम्बर्टो वादळामुळे समुद्रात प्रचंड मोठ्या लाटा उसळत असून, विशेषतः बहामास आणि कॅरेबियन द्वीपसमूहात याचा प्रभाव अधिक जाणवतो आहे. बहामास येथे सध्या मोठ्या प्रमाणावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी २४ तास अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळपर्यंत कॅरेबियन आणि अमेरिकेच्या आग्नेय भागांमध्ये जोरदार पावसासह पूरपरिस्थिती उद्भवू शकते.शनिवारी सकाळपासून क्यूबा आणि बहामासच्या दरम्यान वादळी वार्यांचा वेग ताशी ५६ किमी इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून, अमेरिकेतील आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर तयारीला लागली आहे.
दरम्यान, Hurricane Humberto हम्बर्टोच्या पाठोपाठ आणखी एक वादळ अमेरिकेकडे सरकत असल्याची माहिती समोर आली आहे. ‘इमेल्डा’ नावाचे हे दुसरे वादळही सध्या बहामासच्या दिशेने सरकत असून, आठवड्याच्या शेवटी हे वादळ दक्षिण कॅरोलिना किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, जमिनीवर पोहोचण्याआधीच इमेल्डा वादळाचा वेग कमी होणार असल्याने फारसे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाही.तथापि, या वादळामुळे जोरदार पावसासह किनारपट्टीच्या भागांमध्ये पूर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित भागांतील प्रशासन सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या संपूर्ण परिस्थितीकडे भारतातील नागरिकही लक्ष देत आहेत. विशेषतः या वादळांचा भारतावर काही परिणाम होणार का, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, हे दोन्ही वादळ अटलांटिक महासागर क्षेत्रात असल्याने भारतावर कोणताही प्रत्यक्ष प्रभाव होण्याची शक्यता नाही. त्यामुळे भारतातील नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.हम्बर्टो आणि इमेल्डा या वादळांमुळे अटलांटिक महासागरात वातावरण प्रचंड अस्थिर झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अमेरिका आणि कॅरिबियन देशांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, या वादळांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.