कथा बाप लेकीच्या...’ कथाकथनातून उलगडली नात्‍यांची वीण

28 Sep 2025 19:25:59
नागपूर,
Kishor Galande नागपूरचे ख्यातनाम निवेदक किशोर गलांडे आणि त्यांची सुपुत्री आसावरी गलांडे-देशपांडे यांनी सादर केलेल्‍या नामवंत साहित्यिक व. पु. काळे, शिरीष कणेकर, शिवाजी सावंत यांच्या कथा, गुलजार यांच्या मराठी अनुवादित रचना तसेच विविध कवींच्या कवितांची मैफल रंगत गेली.
 

Kishor Galande  
या भावविभोर सादरीकरणातून या बापलेकीच्या नात्यातील हळुवार वीण उलगडत गेली आणि रसिक मंत्रमुग्‍ध झाले. प्रसंग होता, चिटणवीस सेंटर फॉर कल्चर अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट यांच्या तर्फे लॅबरनम हॉल, चिटणवीस सेंटर येथे ‘कथा बाप लेकीच्या...’ हा अनोखा कथाकथन कार्यक्रमाचा. कार्यक्रमाला विलास काळे, संगीता गलांडे, डॉ. गौरांग देशपांडे, डॉ प्रभाकर देशपांडे, विदर्भ लिटरेरी फेस्टिवल अध्यक्ष जितेंद्र नायक आणि कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला किशोर व आसावरी यांनी गुलज़ार यांची “किताबें झांकती हैं बंद अलमारी की दराज़ों से…” ही प्रसिद्ध कविता सादर करून पुस्‍तक वाचनाचे महत्‍त्‍व सांगितले. त्‍यानंतर आसावरीने कार्यक्रमात शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ कादंबरीतील कर्णाच्या दानशूरपणाची परिसीमा गाठणारा प्रसंग सादर करण्यात आला. विंदा करंदीकर यांच्‍या ‘नजर रोखूनी नजरेमध्‍ये आयुष्‍याला द्यावे उत्‍तर’ या कवितेमधून आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन उलगडला. या दोघांनी मिळून शिरीष कणेकर यांची ‘प्रिन्स हॉटेल’ तसेच व. पु. काळे यांची लोकल प्रवासाच्या तीन कथा ची गूढ कथा अतिशय रंजकपणे सादर केल्‍या. त्‍यांच्‍या ‘तूच माझी वहीदा’ या विनोदी कथा सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. बाप-लेकीचे वाचन वेड, त्यांच्या सादरीकरणातील जिव्हाळा व रंगतदार गप्पांनी कार्यक्रमाला एक वेगळेच ऊर्जित स्वरूप दिले. रसिकांनी साहित्यिक प्रवासाचा मनमुराद आनंद घेत दाद दिली.
Powered By Sangraha 9.0