अखेर तो 'नरभरक्षी' बिबट्या जेरबंद

28 Sep 2025 20:21:55
गोंदिया, 
leopard captured : घराच्या अंगणात लघुशंकेसाठी गेलेल्या पाच वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी घडली होती. या घटनेमुळे गावकर्‍यांनी संताप व्यक्त करत रस्तारोको आंदोलन करून वाहनांची तोडफोड केली होती. दरम्यान, वन विभागाच्या पथकाने शुक्रवारी २८ सप्टेंबर रोजी मोठ्या शिताफीने सदर बिबट्याला जेरबंद केले.
 
 
 
k
 
 
 
 
गोठणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत संजयनगर येथे गुरुवारी बिबट्याच्या हल्ल्यात अंश प्रकाश मंडल या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. प्रसंगी नागरिकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर आपला रोष काढत वाघाला जेर बंद करण्याची मागणी केली होती. त्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून वन विभागाचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत होते. दरम्यान, रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास सदर बिबट्याला जेरबंद करण्यात पथकाला यश आले. आणि वन विभागासह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, अडकलेला बिबट 'तो' नरभक्षीच आहे का ? अशा चर्चा परिसरात सुरू होत्या.
 
 
असा झाला जेरबंद...
 
नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून गेल्या तीन दिवसांपासून शोध मोहीम सुरू होती. दरम्यान, घटनेच्या ठिकाणी व परिसरात पिंजरे लावण्यात आले होते.त्यातच रविवारी दुपारी भक्षाच्या शोधात लावलेल्या पिंजर्‍यात बिबट्याने प्रवेश करताच त्यात अडकला.
 
 
परिसरात लावलेले पिंजरे आणि कॅमेरामध्ये वेळोवेळी टिपलेल्या दृश्यानुसार खात्रीने तोच बिबट असल्याचे निदर्शनास येत आहे. पण तरीही याबाबत फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट बघितला जाईल.
 
- पवनकुमार जोंग उपवनसंरक्षक वनविभाग गोंदिया
Powered By Sangraha 9.0