वर्धा,
Pankaj Bhoyar : जिल्ह्यातील युवा खेळाडूंना चांगल्या व दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजे, यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत. ग्रामीण भागातील युवा खेळाडूंमध्ये जिल्ह्याचे आणि देशाचे नाव लौकिक करण्याची क्षमता आहे, त्यांना चांगल्या सुविधा पुरवून प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
वर्धा तालुका क्रीडा संकुलचे लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक अनुराग जैन, क्रिकेटपटू केदार जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, तहसीलदार संदीप पुंडेकर, तालुका क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे, तालुका क्रीडा विकास समिती अध्यक्ष राजू मडावी, सचिव निलेश किटे उपस्थित होते.
ना. भोयर पुढे म्हणाले, जिल्ह्यात अनेक सामाजिक संघटना नि:स्वार्थपणे पुढे येऊन चांगले उपक्रम राबवित आहे. वृक्षलागवड, मुतांगण, ऑसिजन पार्क असे अनेक कामे सामाजिक संस्था करीत आहे.
टाटा कन्सलटन्सीच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्र या भागात सुरू होणार असून युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण त्यामाध्यमातून मिळणार आहे. टेकडी परिसरात असलेल्या नैसर्गिक वातावरणात नागरिक वॉकिंग, योगा करण्यासाठी येत होते. आता चांगल्या दर्जाचे तालुका क्रीडा संकुल उभारण्यात आल्यामुळे इतरही क्रीडा प्रकाराचा लाभ त्यांना घेता येणार आहे. महिला देखील मोठ्या प्रमाणात येत असून सुरक्षेसाठी पोलिसांनी गस्त वाढविण्याच्या सूचना त्यांनी पोलिस विभागाला दिल्या.
यावेळी केदार जाधव यांनी वर्धेत आल्यावर एक वेगळा विकासाचा दृष्टिकोन पहावयास मिळाल्याचे सांगितले. युवकांनी आपल्या ऊर्जेचा वापर चांगल्या कामासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पोलिस अधीक्षक अनुराग जैन, राजू मडावी यांनीही मनोगत व्यत केले.
यावेळी नमो मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटातून प्रथम सनी फुसाटे, द्वितीय शिवम बठ्ठे, तृतीय प्रयास कोल्हे आणि महिला गटातून प्रथम मधुरा पहाडे, द्वितीय यशस्वी राठोड, तृतीय क्रमांक पटकावणार्या सेजल चौधरी यांना पालकमंत्री भोयर व क्रिकेटपटू जाधव यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. संचालन ज्योती भगत यांनी केले तर आभार संदीप खोब्रागडे यांनी मानले.