धान खरेदी केंद्रे लवकर सुरु करावी

28 Sep 2025 19:05:49
चंद्रपूर,
Sudhir Mungantiwar धान उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आधारभूत किंमत योजनेंतर्गत धान खरेदी व नोंदणी केंद्रे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच सुरु करावीत, अशी मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.
 

Sudhir Mungantiwar  
या संदर्भात आ. मुनगंटीवार यांनी पत्र लिहून प्रश्न लवकर निकाली काढण्याची विनंती केली असून, लवकरच ते प्रत्यक्ष भेट घेऊनही पाठपुरावा करणार आहेत. आ. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे की, चंद्रपूर जिल्ह्यात हलके धान 90 दिवसांत, तर मध्यम धान 120 दिवसांत तयार होते. सिंचन सुविधा नसलेल्या शेतकर्‍यांकडून प्रामुख्याने या प्रकारचे उत्पादन घेतले जाते. मात्र, गेल्या वर्षी (सन 2024-25) धान खरेदी केंद्रे डिसेंबर महिन्यात सुरु झाली. त्यामुळे शेतकर्‍यांना धान साठवून ठेवण्यास अडचण निर्माण झाली. परिणामी अनेकांना खाजगी व्यापार्‍यांना कमी दराने धान विकावे लागले, ज्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले.
मुनगंटीवार Sudhir Mungantiwar  यांनी स्पष्ट केले आहे की, 2025-26 या वर्षात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये. त्यासाठी नोव्हेंबर 2025 च्या पहिल्या आठवड्यातच खरेदी केंद्रे सुरु करावीत. खरेदी केंद्रांवर शेतकर्‍यांना नोंदणीसाठी आणि विक्रीसाठी सुलभ व पारदर्शक व्यवस्था ठेवावी. तसेच शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनाचा मोबदला आधारभूत किंमत नुसार त्वरित अदा करण्यासाठी संबंधित विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत. धान खरेदी केंद्रांची संख्या वाढवून अधिकाधिक शेतकर्‍यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच या मागणीबाबत पाठपुरावा करण्यासाठी ते मुख्यमंत्री आणि अन्न, नागरी पुरवठा मंत्री यांची लवकरच प्रत्यक्ष भेट घेणार आहेत.
Powered By Sangraha 9.0