चंद्रपूर,
bribery trap चंद्रपूर येथील जिल्हा पूनर्वसन कार्यालयातील सहायक महसूल अधिकार्याला 30 हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रविवारी रंगेहाथ अटक केली. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या पुर्नपडताळणी अहवालासाठी त्याने लाच घेतली असून, नरेंद्र विठोबा खांडेकर असे लाचखोर अधिकार्याचे नाव आहे.
तक्रारदार हे चंद्रपूरचे रहिवासी असून, त्यांच्या आईची मालमत्ता चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र येथे गेली होती. याच आधारावर त्यांच्या मुलीचे नाव प्रकल्पग्रस्त म्हणून नोंदविण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत कनिष्ठ अभियंता पदासाठी घेतलेल्या परीक्षेत तक्रारदार यांच्या मुलीची प्रकल्पग्रस्त राखीव जागेतून निवड झाली. या नियुक्तीसाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या पुर्नपडताळणी अहवालासाठी खांडेकर यांनी तक्रारदारांकडे 2 लाख रुपयांची लाच मागणी केली. तडजोडीनंतर जुलै 2025 मध्ये तक्रारदारांनी 1 लाख रुपये दिले होते, तर उर्वरित 30 हजार रुपये अहवाल पाठविताना देण्याचे ठरले होते.
तक्रारदारांनी उर्वरित लाचेची मागणी झाल्यानंतर ती देण्याऐवजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. रविवारी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता खांडेकर यांनी 30 हजाराच्या लाचेची मागणी केली.bribery trap यानंतर आयोजित सापळा कारवाईत खांडेकर यांनी पुर्नवसन कार्यालयातील आपल्या टेबलवर प्रत्यक्ष लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली. खांडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सागर कवडे व अपर पोलिस अधीक्षक माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले, हवालदार हिवराज नेवारे, विजेंद्र वाढई, शिपाई अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, राजेंद्र चौधरी, सचिन गजभिये, महेश माहुरपवार आदींच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.