दुबई.
Copy of Arshdeep-Rana दुबई येथे झालेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव करून ट्रॉफी आपल्या नावे केली. हा विजय केवळ मैदानापुरता मर्यादित राहिला नाही, तर पारितोषिक वितरण सोहळ्यापासून सोशल मीडियापर्यंत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानची चांगलीच खिल्ली उडवली. सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात मोठा वाद झाला. भारतीय संघाने ACC आणि PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. या प्रकारामुळे वातावरण तापले आणि नक्वी ट्रॉफी व पदके आपल्या हॉटेलमध्ये घेऊन गेले. या घटनेमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची घनघोर फजिती झाली.

दरम्यान, सामन्यात संजू सॅमसनला बाद केल्यानंतर पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमदने ‘जा जा जा’ असा सेलिब्रेशन करत भारतीय चाहत्यांना चिडवले होते. पण सामना हरल्यानंतर भारतीय खेळाडूंनी त्याचीच खिल्ली उडवली. अर्शदीप सिंगने आपल्या सहकाऱ्यांसह अबरारच्या सेलिब्रेशनची नक्कल करून व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. त्याच्यासोबत जितेश शर्मा आणि हर्षित राणा होते, तर संजू सॅमसन हसत हसत पाहत होता. Copy of Arshdeep-Rana काही सेकंदांचा हा व्हिडिओ क्षणात व्हायरल झाला आणि अबरार अहमद ट्रोलचा विषय ठरला. या साऱ्या घडामोडींनी पाकिस्तानचा पराभव केवळ मैदानापुरता मर्यादित न ठेवता आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांची इज्जत काढली. दुसरीकडे, भारतीय संघाने आपल्या खेळाने आणि उत्साही सेलिब्रेशनने चाहत्यांची मने जिंकली.
रविवारी, 28 सप्टेंबर रोजी झालेल्या या सामन्यात भारतासाठी तिलक वर्मा हा खरा हिरो ठरला. त्याने नाबाद 69 धावा करून भारताला विजेतेपद मिळवून दिले. शिवम दुबेने 33 धावांची मोलाची भर घातली. दुसरीकडे पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 19.1 षटकांत 146 धावा केल्या. साहिबजादा फरहानने 57 आणि फखर जमानने 46 धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने 4 बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 19.4 षटकांत विजय मिळवला. या विजयासह भारताने आशिया कपचे 9वे विजेतेपद पटकावले.