वर्धा,
Axis Bank loan fraud, अॅसिस बँक कर्ज फसवणूक प्रकरणात धकादायक खुलासे समोर येत आहे. ३ दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर आरोपी गजानन सातव आणि एका महिला आरोपीची तुरुंगात रवानगी झाली. सेवाग्राममधील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये वार्ड इनचार्ज असल्याचे भासवून या प्रकरणातील महिला आरोपीने अॅसिस बँकेकडून १५ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा गंभीर प्रकार पोलिसांच्या तपासात पुढे आला आहे.
एप्रिल २०२४ मध्ये उघडकीस आलेल्या जीएस फायनान्स फसवणूक प्रकरणातील हे आरोपी दाम्पत्य मुख्य आरोपी आहेत. अॅसिस बँकेच्या कर्ज फसवणुकीत त्यांचे संबंध आता उघड झाले आहे. बँकेने नियुत केलेले रिलेशनशिप ऑफिसर शशिकांत मांढरे आणि प्रदीप भांडेकर यांच्याशी गजानन सातव यांचे संबंध उघड झाले आहे. शिवाय, गजानन सातव यांनी इतर दोन व्यतींच्या नावाने घेतलेल्या कर्जाच्या रकमेचा काही भाग स्वतः वापरला. शिवाय या प्रकरणातील मुख्य आरोपी अनंत इंगळे याच्याशीही सातव यांची चर्चा झाल्याची बाब समोर आली आहे.
मुख्य महिला आरोपीने अॅसिस बँकेकडून कर्ज घेतले आहे. यासाठी बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली होती. एवढेच नाही तर तिने स्वतःला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील वार्ड इनचार्ज असल्याचे भासवले. बनावट पेमेंट स्लिप तयार केली. यात ८७ हजार ८८९ रुपये वेतन दर्शविण्यात आले. याच वेतन पावतीच्या जोरावर १५ लाखांच्या कर्जाची उचल करण्यात आली. या कामात तिला तिचे पती गजानन सातव यांची मदत मिळाली. सेवाग्राम रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता संबंधित नावाची महिला कर्मचारी रुग्णालयात काम करत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.