एमडी तस्करांवर एलसीबीचा भीमलठ

29 Sep 2025 19:20:53

उमेश ताकसांडे

वर्धा,
MD drug smuggling, आजची तरुणपिढी नशेखोरीच्या आहारी गेली आहे. सिगारेट, दारू, गांजा या खालोखाल आता जिल्ह्यात ड्रग्जचाही पुरवठा होत आहे. थेट मुंबईतील ड्रग्ज डिलरकडून ड्रग्जचा पुरवठा होत असल्याचे काही कारवायादरम्यान पुढे आले आहे. ही चिंतेची बाब असून जिल्ह्यात ड्रग्जला थारा न देता स्थानिक गुन्हे शाखेने या तस्करांवर करडी नजर ठेऊन लहान-मोठ्या ९ कारवाईत २० जणांच्या मुसया आवळल्या. या कारवायांमध्ये ४८८ ग्रॅम ४६० मिलीग्रॅम एमडी ड्रग्ज आणि साहित्यांसह ३१ लाख ६३ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 

MD drug smuggling, 
दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूचे पाट वाहत आहे. कमी वेळेत जास्त पैसा कमावण्याच्या नादात अनेकांनी दारूचा व्यवसाय पत्करला. या दारूच्या आहारी थोरांपासून तरुण व युवा पिढीही गेली. मात्र, नशेखोरीला सीमाच नसल्याचे चित्र सध्या ज्ल्ह्यिात दिसून येत आहे. तरुणांसह महाविद्यालयीन मुलं-मुलींसाठी सिगारेट फॅशन झाली आहे. मोठमोठ्या शहरांतील रेव्ह पार्ट्याचे अनुकरण करीत आता जिल्ह्यातील तरुणांच्या हाती गांजा आणि एमडी ड्रग्ज दिसू लागला आहे. ही चिंतनीय बाब असून पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी ड्रग्ज तस्करांच्या मुसया आवळण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत.
 
 
 
 
पोलिस अधीक्षक जैन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्त्वात मोहिमच उघडली आहे. जिल्ह्यातील एमडी ड्रग्ज तस्करांवर करडी नजर ठेवून जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत लहान मोठ्या ९ कारवाया केल्या. या कारवायांमध्ये तब्बल २० ड्रग्ज तस्करांना जेलची हवा खावी लागली असून त्यांच्याकडून ४८८ ग्रॅम ४६० मिलीग्रॅम ड्रग्ज जप्त केले. या ड्रग्जसह ३१ लाख ६३ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन महिन्यांपूर्वीच वर्धा शहरात मोठी कारवाई करण्यात आली. मुंबईतील महिला ड्रग्जची खेप घेऊन वर्धेला येत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. वर्धेतील ज्या तस्कराकडे ही खेप पोहचणार होती त्या घरावर एलसीबी पथकाने काही दिवसांपासून पाळत ठेवली होती. डिलींगच्या दिवशी मुंबईतील महिलांसह शहरातील काहींना अटक केली. ड्रग्ज संदर्भात केलेही ही मोठी कारवाई होती. या कारवाईदरम्यान एक पिस्तूल सुद्धा जप्त करण्यात आले. यावेळी एलसीबीने ४०० ग्रॅम एमडी जप्त करून तस्करांच्या मुसया आवळल्या होत्या. यापुढेही ड्रग्ज विरोधी कारवाया सुरूच राहणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.
Powered By Sangraha 9.0