नागपूर,
Nagpur road accident, रविनगर उड्डाणपुलावर अपघाताची पुन्हा एक घटना घडली आहे. खाजगी बसचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवीत चारचाकी वाहनाला मागून जबर धडक दिली. त्यामुळे ती चारचाकी समोरच्या कारवर जाऊन धडकली. या अपघातात तीन जण जखमी झाले, तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आरोपी खाजगी बसचा चालक सुजशकुमार श्रीगोपालसिंग (32) रा. समरपूर, दिल्ली याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
जखमींमध्ये चारचाकी चालक नीतेश पाटील (34) रा. गारपीठ, वर्धा, उज्ज्वला रामटेके (51) आणि स्नेहल रामटेके (25) दोन्ही रा. कारंजा, वर्धा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, उद्घाटनाच्या दुसèयाच दिवशी या पुलावर अपघाताची घटना घडली होती. त्यानंतर हा पूल बंद करण्यात आला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीतेश यांचे मित्र स्वप्निल कालोकार यांची नातेवाईक स्नेहल हिची मुंबईला परीक्षा होती. शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास तिला नागपूर रेल्वेस्थानकावर सोडायचे होते. त्यामुळे स्वप्निल यांनी नीतेश यांच्याकडे चारचाकी वाहन असल्याने नागपूर रेल्वे स्थानकावर सोडण्याची विनंती केली. नीतेश नागपूरला जाण्यासाठी तयार झाले. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास नीतेश, त्यांचा मित्र राहुल भांगे, स्नेहल आणि तिची आई उज्ज्वला असे चार जण एमएच-27/एआर-4679 क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने नागपूरकडे निघाले. जवळपास दोन तासांत ते नागपूरला पोहोचले.
रविनगर उड्डाणपुलावरून रेल्वे स्थानकाकडे जात असताना मागून आलेल्या खाजगी बसचालक सुजशकुमार याने त्यांच्या वाहनाला जबर धडक दिली. या धडकेमुळे त्यांचे वाहन समोरच्या कारवर जाऊन धडकले. या अपघातात नीतेश, स्नेहल आणि उज्ज्वला यांना गंभीर दुखापत झाली, तर दोन्ही कारचेही मोठे नुकसान झाले. माहिती मिळताच सीताबर्डी पोलिस घटनास्थळी पोहोचले. जखमींना उपचारार्थ जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. नीतेश यांचे बयाण नोंदवून खाजगी बसचालक सुजशकुमारविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सुरू आहे.