नागपूर,
Operation Thunder ऑपरेशन थंडर मोहिमेंतर्गत अमली पदार्थविरोधी पथकाने प्रतापनगर आणि पाचपावली ठाण्यांच्या हद्दीत सापळा रचून एमडी पावडर, हेरॉईन तस्करांच्या मुसक्या आवळल्या. दोन्ही कारवायांमध्ये अमली पदार्थासह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्रतापनगर Operation Thunder परिसरात एक युवक अमली पदार्थाची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती एनडीपीएस पथकाला मिळाली. खात्रीलायक माहितीच्या आधारे पथकाने कामगार नगर परिसरात सापळा रचला. चेतन मुन्ना महातो (29) रा. सुभाष नगर हा संशयास्पद स्थितीत आढळला. विचारपूस केली असता तो घाबरला. पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याजवळ एका झिपलॉक पाकिटात 106 ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. त्याच्याजवळून एमडी पावडरसह एक मोबाईल, दुचाकी असा एकूण सहा लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध 302, 326, 324 भादंविअन्वये 3 गुन्हे दाखल आहेत. सखोल चौकशीत त्याने अकबर शेख रा. मुंबई याच्याकडून एमडी पावडर घेतल्याचे सांगितले. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
दुसरी Operation Thunder कारवाई पाचपावली ठाण्यांतर्गत करण्यात आली. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने वैशालीनगर परिसरात आरोपी रकीम अहमद मलिक (55) रा. ताजनगर, टेका याची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याजवळ एक झिपलॉक पाकीट आढळले. पाकिटात 12 ग्रॅम हेरॉईन पावडर होते. त्याच्याजवळून हेरॉईन, एक मोबाईल, दुचाकी असा एकूण एक लाख 71 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सखोल चौकशी केली असता साथीदार कयूम अहमद मलिक रा. कपिलनगर याच्या मदतीने हेरॉईन पावडर आणल्याचे आरोपीने सांगितले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पाचपावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्या साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने, सपोनि संदीप जाधव, उपनिरीक्षक नागेश पुन्नावाड, पोहवा मनोज नेवारे, विवेक अढाऊ, विजय यादव, अरविंद गडेकर, पवन गजभिये, सहदेव चिखले, राहुल पाटील, गणेश जोगेकर यांनी ही कारवाई केली.