निरोगी हृदयासाठी सजगतेची गरज

29 Sep 2025 06:30:43
मुंबई
World Heart Day दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक हृदय दिन (World Heart Day) हा हृदयरोगांविषयी जनजागृती निर्माण करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न मानला जातो. सध्या बदलती जीवनशैली, वाढता तणाव, अपुरी झोप, अनियमित आहार आणि व्यायामाचा अभाव या कारणांमुळे हृदयरोगाचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. त्यामुळेच हृदयाच्या आरोग्याबाबत जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे.
 
 
World Heart Day
यावर्षीच्या जागतिक हृदय दिनाची संकल्पना "Use Heart, Know Heart" अशी असून, हृदयाबाबतची जाणीव आणि काळजी यावर भर देण्यात आला आहे. हृदय हा आपल्या शरीरातील सर्वांत महत्त्वाचा अवयव असून त्याच्या सतत चालणाऱ्या क्रियाशीलतेवरच आपले संपूर्ण जीवन अवलंबून असते. मात्र, आधुनिक जीवनशैलीत हृदयाकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे.
 
 
राज्यभरातील World Heart Day विविध रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी या दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, जनजागृती रॅली, व्याख्याने आणि चर्चासत्रांचे आयोजन केले. हृदयरोग तज्ज्ञांनी लोकांना योग्य आहार, नियमित व्यायाम, तंबाखू आणि मद्य सेवन टाळणे, तसेच तणाव व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून दिले.हृदयविकाराची प्राथमिक लक्षणे म्हणजे छातीत जडपणा, थकवा, श्वास घेण्यास त्रास, डाव्या हाताला किंवा जबड्याला जाणारा वेदना इत्यादींची नागरिकांनी माहिती ठेवणे गरजेचे आहे. वेळेत उपचार न झाल्यास हृदयविकाराचा झटका घातक ठरू शकतो.
 
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगभरात होणाऱ्या मृत्यूंपैकी जवळपास ३१ टक्के मृत्यू हे हृदयविकारांमुळे होतात. यामध्ये भारताचा वाटा लक्षणीय आहे. त्यामुळेच वैयक्तिक आरोग्याच्या दृष्टीने सजग राहणे अत्यावश्यक आहे.हृदय दिन हा केवळ एक औपचारिकता न राहता, संपूर्ण वर्षभरासाठी आरोग्य जपण्याचा एक निर्धार व्हावा, अशी भावना आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. हृदयाची काळजी घेतल्यास आयुष्य अधिक निरोगी, दीर्घ आणि समाधानी होऊ शकते, हेच या दिनाचे खरे सार आहे.आज भारत हृदयरोगांच्या बाबतीत ‘जागतिक राजधानी’ बनू पाहत आहे, हे चित्र भयावह आहे. याचा अर्थ केवळ वैयक्तिक नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही धोकादायक आहे. कारण हृदयरोग केवळ आरोग्य बिघडवत नाही, तर कुटुंबे उद्ध्वस्त करतो, उत्पादकता कमी करतो आणि आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण आणतो.
 
 
 
हृदयविकारांचं World Heart Day  तरुणांमध्ये वाढतं प्रमाण ही एक गंभीर चेतावणी आहे. काही दशकांपूर्वी ५०-६० वयाच्या व्यक्तींमध्ये हे आजार दिसत होते. आता ३०-३५ वयाच्या तरुणांनाही अचानक हार्ट अटॅक येतो आहे. यामागे धकाधकीचं जीवन, सततचा ताण, junk food, झोपेचा अभाव, व्यायामाचा अभाव आणि स्क्रीन-वर केंद्रित झालेलं आयुष्य जबाबदार आहे.हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी औषधं आवश्यक आहेत, पण त्याहून महत्त्वाचे आहे वर्तनात बदल. आपण आपल्या आहारात साखर, मीठ आणि चरबीयुक्त पदार्थांचे प्रमाण कमी करायला हवे. रोज किमान ३० मिनिटे चालणं, योग किंवा व्यायाम करणं, वेळेवर झोपणं आणि मानसिक शांतता राखणं — हे ‘रॉकेट सायन्स’ नाही, पण अमूल्य आहे.जागतिक हृदय दिन हा एक स्मरणदिनी न राहता, कृतीचा प्रारंभ बिंदू व्हावा, हीच या दिवसामागची खरी भावना असावी. आज एक दिवस 'हृदयाची काळजी' घेण्याची शपथ घेतली, पण उद्या पुन्हा तीच धावपळ, तेच fast food, तोच ताण असेल, तर अशा दिनांचे औचित्यच काय? या विषयाकडे अधिक गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. शहरांमध्ये सायकल ट्रॅक, चालण्याच्या सुलभ सोयी, सार्वजनिक व्यायाम सुविधा, आरोग्य तपासणी शिबिरे आणि आरोग्य शिक्षण ही केवळ शोभेची बाब नसून आरोग्यविषयक गुंतवणूक आहे.
 
 
शाळांपासूनच हृदयविकाराविषयी प्राथमिक शिक्षण दिलं गेलं पाहिजे. कामाच्या ठिकाणी 'स्ट्रेस मॅनेजमेंट'चे मार्गदर्शन, मधल्या सुट्टीत थोडी शारीरिक हालचाल, आणि व्यसनमुक्तीसाठी धोरणात्मक प्रयत्न झाले पाहिजेत.हृदयाकडे दुर्लक्ष परवडणारे नाही. कारण जेव्हा हृदय थांबतं, तेव्हा आयुष्यही थांबतं. आणि म्हणूनच, आपण प्रत्येकाने आजपासूनच आपल्या हृदयासाठी काही निर्णय घ्यायला हवेत.

कारण शेवटी, हृदय चाललं तरच आयुष्य चालतं.
Powered By Sangraha 9.0