हडस्ती शेतशिवार सातव्यांदा जलमय

30 Sep 2025 20:02:07
विसापूर, 
kharip-season-flood : बल्लारपूर तालुक्यात शेवटच्या टोकावर हडस्ती गाव आहे. इरई व वर्धा नदीलगत येथील शेतकर्‍यांची शेती आहे. यामुळे कधी निसर्गाचा फटका बसतो तर कधी मानव निर्मीत संकटाचा सामना करावा लागतो. यावर्षी पावसाने चांगलेच थैमान घातले. परिणामी, शेतकर्‍यांचा खरीप हंगाम पावसाने वाहून गेला. वर्धा व इरई नदीच्या पुराने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. हडस्ती शेतशिवारात तब्बल सातव्यांदा आलेल्या पुराने शेतशिवार जलमय झाले आहे. पिकांची नासाडी झाल्याने शेतकर्‍यांत आक्रोश निर्माण झाला आहे.
 
 
 
CHAND
 
 
 
तालुक्यातील कृषी व्यवसाय निसर्गाच्या जलचक्रावर अवलंबून आहे. पूरामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मिरची, भाजीपाला व अन्य कडधान्य पिकांची नासाडी झाली आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. ही एका हडस्ती गावातील शेतकर्‍यांची व्यथा नाही तर बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे), चारवट, विसापूर, बल्लारपूर, बामणी (दुधोली), दहेली, कळमना, आमडी, पळसगाव, कोठारी आदी गावातील शेतकर्‍यांची देखील सारखीच व्यथा आहे.
 
 
शेतकर्‍यांनी कष्टाने खरीप हंगामासाठी बी-बियाणे, मजुरी, शेतीची मशागत करून पेरणी केली. मात्र, पावसाने शेतकर्‍यांच्या आशेवर पाणी फेरले. शासन स्तरावर पंचनाम्याची प्रक्रिया होणार असून मदतीची घोषणा अपेक्षित आहे. मात्र शेतकर्‍यांच्या डोळ्यातील अश्रू थांबणार नाही, असेच चित्र आहे.
 
सगळी मेहनत वाया गेली : शेतकरी सुरेश गौरकार
 
 
शेतामध्ये रविवारी मिरची पिकाची लागवड केली. पण अचानक वर्धा व इरई नदीच्या पुराने शेतशिवार जलमय झाले. यामुळे अवसान गळाले. सगळी मेहनत वाया गेली. सततच्या पूराने शेतकर्‍यांची दैना झाली आहे. कापूस, सोयाबीन, भाजीपाला पिकांचे पुराने मोठे नुकसान झाले. आर्थिक तोटा एवढा आहे की रब्बी हंगामातूनही तो भरून निघणे अशक्य आहे, असे हडस्तीचे शेतकरी सुरेश गौरकार यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0