चिमूर,
kolara-forest-range-office : तालुक्यातील कोलारा वनपरिक्षेत्र (वन्यजीव) कार्यालयावर मंगळवार, 30 सप्टेंबर रोजी सातारा व बामनगावातील शेकडो महिला-पुरुष शेतकर्यांचा मोर्चा धडकला. वाघ व इतर हिंस्त्र प्राण्यांच्या वाढत्या धुमाकुळामुळे शेतकर्यांची गुरेढोरे ठार होत असून, शेतीचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे दहशतीत दिवस काढणार्या शेतकर्यांनी सातारा गावचे सरपंच गजानन गुळधे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या अधिकार्यांना निवेदन देत वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
कोलारा वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी वैद्य यांना यावेळी निवेदन देण्यात आले. सातारा-बामणगाव ही गावे व्याघ्र प्रकल्पालगत असून, शेती व्यवसायावर उदरनिर्वाह करणारे शेतकरी वाघ व इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे भयभीत झाले आहेत. शेतकर्यांची गुरेढोरे वाघाने हल्ला करून ठार मारल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. वाघ आणि वन्य हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे गावकर्यांचे म्हणणे आहे.
निवेदन सादर करताना सुरेश जांभुळे, मोरेश्वर शेडामे, प्रियंका बावणे, दिनेश कोडापे, मासळचे सरपंच विकास धारणे, विकास भोयर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. दरम्यान, आरएफओ वैद्य यांनी शेतकर्यांकडून आलेल्या निवेदनातील मागण्या वरिष्ठ वनविभागाकडे पाठविणार असल्याचे गावकर्यांना सांगितले.