मुंबई,
Pankaja Munde : राज्यभरात दसरा म्हटलं की दोन मेळावे विशेष चर्चेत असतात. शिवसेनेचा दसरा मेळावा आणि बीड जिल्ह्यात होणारा पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा. यंदाही दोन्ही ठिकाणी तयारी जोरात सुरू आहे. मात्र, यंदाचा पंकजा मुंडेंचा मेळावा नेहमीपेक्षा वेगळा असणार आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे, ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा संकटग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी पंकजा मुंडेंनी समर्थकांना आवाहन केले आहे.
“यंदा दसरा मेळावा फक्त सभा किंवा राजकीय व्यासपीठ नसेल. भगवान बाबांनी सुरू केलेली आणि मुंडे साहेबांनी पुढे नेलेली परंपरा आपण पुढे नेऊ. माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत ही परंपरा खंडित होऊ देणार नाही. पण या वेळी मेळाव्याला येताना प्रत्येक समर्थकांनी चणा डाळ, गव्हाचे पीठ आणि गूळ घेऊन यावे. हा प्रसाद भगवान बाबा चरणी अर्पण करायचा आणि त्यानंतर पूरग्रस्तांच्या घरी पोहोचवायचा आहे,” असे पंकजा मुंडेंनी आवर्जून सांगितले.
त्यांनी स्पष्ट केले की पूरामुळे मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये घरांचे आणि उपजीविकेचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांची चूल पेटेनाशी झाली आहे. दसऱ्याच्या दिवशी ज्यांच्या घरात पुरणपोळी शिजणार नाही, त्यांच्यापर्यंत हा प्रसाद पोहोचवण्याचा उद्देश आहे.
“माझा दसरा मेळावा साधाच असतो. अठरापगड जातीधर्मांचा संगम असलेल्या या परंपरेतून मला वर्षभर संघर्ष करण्याची ऊर्जा मिळते. तुमच्या दर्शनातून मला शक्ती मिळते. म्हणूनच या वर्षी मेळाव्यात उत्साह असेल, पण त्याला पूरग्रस्तांसाठीची भावनिक किनार असेल,” असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.
त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून समर्थकांना आवाहन करत सांगितले की, “२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सावरगाव घाट, भगवान भक्ती गड येथे भेटूया. मात्र, यंदा सोबत अन्नधान्य घेऊन या आणि पूरग्रस्तांना दिलासा देऊया.”