नवी दिल्ली,
ravan market-delhi राजधानी आपल्या खास इतिहासासाठी, बाजारपेठा आणि खवय्येगिरीसाठी प्रसिद्ध आहे. सध्या दिल्लीच्या बाजारपेठा लहानमोठ्या रावणांनी फुलल्या आहेत. प्रत्येकाला दसऱ्याच्या दिवशी रावण जाळायचाय. या बाजारात टोकदार दातांचा, मोठ्या डोळ्यांचा आक्रस्ताळा रावण सर्व आकारांमध्ये उपलब्ध आहे. हे बघून स्वत: दशाननालाही प्रश्न पडला असेल की, मला हजारांवर मस्तकं आली तरी कुठून? काय आहे या बाजाराचा इतिहास? जाणून घेऊ या!
(फोटो इंटरनेटवरून साभार)
ravan market-delhi पश्चिम दिल्लीतील तितारपूर भागात लंकेश मंडी सज्ज आहे. इथे 2 फुटांपासून 70 फूटांपर्यंतचे महाकाय रावण, दहनासाठी उपलब्ध आहेत. या बाजारात सध्या कमी किमतीत रावण मिळविण्याचे महाभारत सुरू आहे. सुमारे 50 वर्षांपूर्वीपासून इथे रावण बनविण्याची परंपरा आहे. रंगबिरंगी, भडक चित्रकलेचे रावण बनविण्याचे काम जुलै महिन्यापासूनच सुरू होते. रावणाचा ढाचा बनविणारे, रंगविणारे, डिझाईन करणारे लोक वेगवेगळे आहेत. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून लांबसडक बास दिल्लीत दाखल होतात. त्यांना विविध आकार देऊन डोकं, छाती आणि अंगरखे बनविले जातात. रावणाच्या या अस्थि पंजर आकाराला जंगला असे म्हणतात. जंगलावर विशिष्ट पद्धतीने साडी गुंडाळतात आणि त्यावर खाकी रंगाचा कागद चिटकवतात.
ravan market-delhi शेवटी वटारलेले डोळे, भडक दागिने, मुकुट असे रंगबिरंगी कागद चिकटवून रावणाचा शेवटचा मेकअप केला जातो. पण, काही ग्राहकांना स्पेशल इफेक्ट्स हवे असतात. मग त्याच्या आत लहानमोठे फटाके, बॉम्ब, फुलझड्या आणि रॉकेट लावले जातात. यासाठी ग्राहकांच्या सूचना ग्राह्य धरल्या जातात. मग रावणाची विक्री सुरू होते. पाचशे रुपयांपासून ३०-४० हजार रुपयांपर्यंत किमतीचे रावण इथे मिळतात. काही हौशी लोक आधीपासून बुकींगही करून ठेवतात. इथे तयार होणारे रावण दिल्लीसोबतच उत्तर प्रदेश, पंजाब आणि बिहारमध्येही विकला जातो. यावर्षी अमेरिका आणि कॅनडामधूनही रावणाला मागणी होती. या भागात शेकडो संसार ‘रावण भरोसे’ चालत असून, रावण जळतो म्हणून या घरांमध्ये चुली पेटतात.