श्याम पांडे
दारव्हा,
Shri Vishwai Vishweshwar Temple : तरनोळी येथील श्री विश्वाई विश्वेश्वर मंदिर देवीच्या उपासनेचे महत्वाचे केंद्र असून याला बाराव्या शतकापासूनचा इतिहास आहे. साडेतीन हजार लोकवस्तीच्या या गावाला आख्यायिकेनुसार ‘तृणवल्ली’ हे नाव होते. नंतर ‘तरणवळी’ आणि ‘तरनोळी’ असा अपभ्रंश झाल्याचे सांगण्यात येते.
तरनोळी हे गाव दारव्ह्यापासून 20 किमी अंतरावर आहे. गावात शंकर आणि विश्वाईदेवी अशी दोन प्राचीन मंदिरे होती. त्यापैकी शंकराचे मंदिर बèयापैकी अवस्थेत असून येथे उमा महेश्वर, गणपती मूर्ती दिसून येतात.
ब्रिटिश काळामध्ये, 1831 च्या दरम्यान तरनोळी गावाचे सर्वेक्षण झाले होते. त्यातील नोंदींनुसार गावात दोन उद्ध्वस्त हेमाडपंती मंदिरे असून ती अनुक्रमे दुर्गादेवी आणि चामुंडादेवी यांना समर्पित आहेत.
या मूर्त्यांमध्ये, विशेषत: चामुंडा देवीची मूर्ती प्रमाणबद्धता व आकारानुसार कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. याशिवाय मंदिराच्या आजूबाजूला तुटलेल्या मूर्ती व कोरीव दगडांचे अवशेष आहेत. गावाचा इतिहास 12 व्या शतकापर्यत जुना असल्याचे अवशेषांवरून दिसून येते.
गावात पूर्वी पांढèया मातीची गढी होती. त्यास चार बाजूंना बुरुज होते. याला देशमुखाची गढी असे म्हणत. तरनोळी गावाच्या चार दिशांना देवीची चार मंदिरे आहेत. त्यांची मेसकाईमाई, तारामाई, वाघामाई आणि भवानीमाय अशी नावे आहेत.
गावाचे रक्षण करण्यासाठी गावकुसाबाहेर व गावाच्या मधोमध ग्रामदेवता असत. मंदिरालगत असलेले विश्वाई मंदिर, म्हणजेच विश्वेश्वर मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार झाला आहे.
या मंदिराच्या गर्भगृहात चामुंडा देवीची पूजा केली जाते. चामुंडा देवीजवळच भैरवमूर्ती असून त्यांना विश्वाई आणि विश्वेश्वर नावाने ओळखले जाते. काही लोक याला इसा माय म्हणूनही संबोधतात.
1831 नंतरच्या गॅझेटियरमध्ये असलेल्या चामुंडादेवी आणि दुर्गादेवी या मंदिराच्या विशेष नोंदींवरून येथे शाक्त संप्रदायात देवीची पूजा केली जात असल्याचा अंदाज व्यक्त करून वणी व नेर तालुक्यातील रेणुकापूर याच धर्तीवर तरनोळी हेसुद्धा देवीच्या उपासनेचे केंद्र असावे, अशी माहिती सुभाष कदम यांनी दिली.
मंदिरात वाचनालय असून वाचनाचा लाभ विद्यार्थी घेतात. गावामध्ये आजही धार्मिक परंपरा जपल्या जातात. मंदिरात नवरात्रीत पवन खोडे यांचा भागवत सप्ताह सुरू आहे. मुकेश चुडे, जय गुरुदेव भजनी मंडळ, चेतन सेवांकुर संगीत रजनी, गुरुदेव विश्वाई विश्वेश्वर महिला भजनी मंडळ, नवरात्री दांडिया उत्सव, गजानन गीतमाला आणि व्यसनमुक्तीसम्राट मधुकर खोडे नवरात्रीत सेवा देत आहेत.