संघाचा अनोखा शब्दयज्ञ

30 Sep 2025 14:28:18
दिल्ली अग्रलेख
ritual of the sangh शंभर वर्ष म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या आणि संस्था तसेच संघटनेच्या जीवनातील मोठी उपलब्धी म्हटली पाहिजे. असे भाग्य फार कमी व्यक्तींच्या तसेच संस्था संघटनांच्या नशिबात असते. शंभर वर्षांचा प्रवास हा तसा सहज आणि सोपा नसतो. व्यक्ती असो की संघटना त्यांना अनेक प्रकारच्या टीकेला, कष्टांना, संकटांना, उपेक्षांना, हालअपेष्टांना तसेच आरोप-प्रत्यारोपांना सामोरे जावे लागते. संस्था आणि संघटनेच्या तुलनेत व्यक्तीच्या आयुष्यात याचे प्रमाण तुलनेत कमी असते. मात्र या आव्हानांचा जे सामना करू शकतात, तेच काळाच्या कसोटीवर उतरतात, शतकपूर्तीच्या प्रवासात यशस्वी होतात, समाजजीवनात आपल्या कर्तृत्वाचा अनमोल असा ठसा उमटवतात.
 

संघ  
 
 
रा. स्व. संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहे. यंदाच्या विजयादशमीपासून 2026 च्या विजयादशमीपर्यंत संघ आपला शताब्दी महोत्सव साजरा करणार आहे, त्याचा श्रीगणेशा झाला आहे. या प्रवासात व्यक्तीच्या तुलनेत संस्था, संघटनेला अधिक प्रमाणात सिंहावलोकन करावे लागते. आपला आतापर्यंतचा प्रवास, त्यात आलेले अडथळे आणि ज्या ध्येयासाठी स्थापना झाली, त्याच्या किती जवळ आपण पोहोचलो वा ते लक्ष्य गाठले का, गाठले नसेल तर आपण कुठे कमी पडलो आणि गाठले असेल तर आता पुढे काय करायचे, याचा आढावा घ्यावा लागतो. रा. स्व. संघाचा शंभर वर्षांचा चैतन्यदायी, गौरवपूर्ण आणि आशादायक प्रवास देशातील समस्त हिंदूंसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा म्हटला पाहिजे. रा. स्व. संघाने आपल्या शताब्दीनिमित्त देशवासीयांशी संपर्क आणि संवाद साधण्याचे ठरवले आहे. हे संघाच्या प्रकृतीला साजेसेच म्हटले पाहिजे. देशभरात असे चार महत्त्वाकांक्षी संवाद कार्यक्रम होणार असून त्यातील पहिला कार्यक्रम राजधानी दिल्लीच्या विज्ञान भवनात मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. परम् पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी या त्रिदिवसीय कार्यक्रमातून संघाबाबत जनमानसाला पडणाऱ्या अनेक प्रश्नांना, आक्षेपांना आणि आरोपांना मुद्देसूद आणि समर्पक असे उत्तर दिले. पहिल्या दोन दिवसांत त्यांनी संघाची आतापर्यंतची वाटचाल आणि भविष्यात काय करायचे याचा आराखडा सादर केला, तर तिसऱ्या आणि अंतिम दिनी प्रश्नोत्तर सत्रातून विविध मुद्यांवर संघाची भूमिका स्पष्ट केली. देशातीलच नाही तर जगातील सर्वांत मोठी स्वयंसेवी तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना म्हणून संघ ओळखला जातो. संघपरिवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहत् संघ परिवारात जवळपास तीन डझन संघटना आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक संघटनेचा कार्यविस्तार हा राष्ट्रव्यापी आहे. त्यामुळेच आज स्थानिक तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यावर संघाची भूमिका काय आहे, असा प्रश्न सर्वांना पडतो.
2014 नंतर भाजपा सत्तेवर आल्यामुळे संघाला सोन्याचे दिवस आले, असे काही जण म्हणतात. पण ते पूर्ण सत्य नाही तर अर्धसत्य म्हणावे लागेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयात एक सुविचार त्यांनी लावला आहे. अमेरिका श्रीमंत आहे, म्हणून तेथील रस्ते चांगले नाहीत, तर तेथील रस्ते चांगले आहेत, म्हणून अमेरिका श्रीमंत आहे, या अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जॉन एफ. केनेडी यांच्या विधानासारखी ही स्थिती आहे. संघाच्या हजारो प्रचारकांनी आणि लाखो नाही तर कोट्यवधी स्वयंसेवकांनी 1925 पासून केलेल्या त्यागामुळे, कष्टामुळे, समर्पणामुळे आणि बलिदानामुळे भाजपाला आज सोन्याचे दिवस आले, ही वस्तुस्थिती आहे. संघ ही हिंदूंची संघटना म्हणून ओळखली जात असली तरी संघाची हिंदुत्वाची व्याख्या संकुचित आणि मर्यादित नाही. या देशात राहणारे ते सर्व हिंदू मग ते कोणत्याही धर्माचे आणि पंथाचे असो, अशी संघाची धारणा आणि विश्वास आहे. संघाचे हिंदुत्व हे सर्वसमावेशक तसेच सहिष्णू असे आहे. त्यामुळे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संघ स्वयंसेवक मदतीला धावून जाताना समोरची व्यक्ती कोणत्या धर्माची आणि पंथाची आहे, याचा विचार करत नाही.ritual of the sangh एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी माणुसकीच्या नात्याने वागावे, तशी संघ स्वयंसेवकांची वागणूक असते. त्यामुळेच संघ जर समजून घ्यायचा असेल तर संघाजवळ या, संघात या आणि मगच संघाबद्दलचे आपले मत बनवा, असे आवाहन डॉ. भागवत यांनी केले. कारण एकदा का संघाची ओळख पटली, संघ समजला की जवळ आलेली व्यक्ती संघापासून कधीच दूर होऊ शकत नाही, ती संघाची होऊन जाते. संघाबद्दल काही व्यक्ती आणि संघटनांनी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्याचे काम केले, असे म्हणावे लागेल. अनेक खोट्या प्रकरणांत आणि आरोपांत संघाला अडकवण्याचा प्रयत्न झाला. संघावर बंदी घालण्याचाही प्रयत्न झाला. पण आगीतून सोने झळाळून निघते, तसा संघ प्रत्येकवेळी यातून सहीसलामत बाहेर पडला. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत संघाचे स्वयंसेवक देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्ष करत होते. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा सर्वांगीण विकास व्हावा, भारताने विश्वगुरू व्हावे म्हणून संघ प्रयत्नशील आहे. संघाच्या अथक आणि अव्याहत प्रयत्नामुळे देश आज विश्वगुरुपदाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळेच आज सरसंघचालक म्हणून डॉ. भागवत यांनी केलेले कोणतेही विधान हे वृत्तवाहिन्यांसाठी ब्रेकिंग न्यूज बनते. त्याची राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होते. हे संघाचे काम वाढल्याचे, संघ सर्वस्पर्शी झाल्याचे द्योतक आहे. कधीकाळी ज्या संघाची उपेक्षा केली जात होती, त्या संघाची आज प्रत्येक मुद्यावर जगाला दखल घ्यावी लागते, हे संघाच्या फक्त वाढलेल्या वयाची नाही तर त्यांच्या वाढलेल्या कामाची मोठी उपलब्धी म्हणावी लागेल.
संघात आतापर्यंत पाच सरसंघचालक होऊन गेलेत. डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली, दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांनी संघाला आकार दिला. तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय देवरस उपाख्य बाळासाहेब देवरस यांनी संघाचा सर्वव्यापी विस्तार केला. प्रो. राजेंद्रसिंह उपाख्य रज्जूभय्या तसेच कुप्प्. सी. सुदर्शनजी यांचेही संघाला सर्वव्यापी आणि सर्वसाक्षी करण्यात अनन्यसाधारण असे योगदान आहे. सहावे सरसंघचालक म्हणून डॉ. मोहनजी भागवत यांनी संघाच्या मंदिररुपी कार्यावर सोन्याचा कळस चढवला, असे म्हटले तर चूक ठरू नये. मात्र असे असले तरी संघ हा व्यक्तिकेंद्री आणि व्यक्तिपूजक नाही तर त्याने भगव्या झेंड्याला आपला गुरू मानले आहे. त्याच भगव्या झेंड्याच्या आधारे संघाने भारताचा प्रवास हिंदू राष्ट्रापर्यंत केला आहे. भारताचे नावच हिंदुस्थान आहे, यापेक्षा हिंदू राष्ट्राचा मोठा पुरावा कोणता असू शकतो? कधी काळी भारतात सोन्याचा धूर निघत होता, दुधाच्या नद्या वाहात होत्या, असे म्हटले जाते. तो गौरवशाली सुवर्णकाळ भारताला पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी संघ झटत आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही.
कधीकाळी संघावर प्रेम करणाऱ्यांची संख्या कमी होती, तर द्वेष करणाऱ्यांची जास्त. पण आता काळाच्या ओघात या तराजूचे पारडे बदलले आहे. संघावर प्रेम करणारे बहुसंख्य झाले, तर राग आणि द्वेष करणारे अल्पसंख्य होत आहे. यातील अल्पसंख्य हा शब्द फक्त गणितीय आहे. संघाची कार्यपद्धती, हिंदू-मुस्लिम वाद, तसेच भाजप आणि संघ यांचे संबंंध याबाबतच्या सर्व प्रश्नांना डॉ. भागवत यांनी समर्पक उत्तरे दिली. 75 वर्षांचे निवृत्तीचे वय तसेच भाजपाबाबत संघ काय बोलणार, अशी उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. पण भाजपावर संघाचा रिमोट कंट्रोल नाही, भाजपाचे निर्णय ते घेतात, त्यात आमचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो, हे त्यांनी सांगून टाकले. तसेच 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवृत्त होण्याबाबत मी कोणतेही विधान केले नव्हते, असे स्पष्ट करत डॉ. भागवत यांनी या संदर्भातील सर्व अनावश्यक चर्चांना पूर्णविराम दिला. तीन दिवसांच्या या शब्दयज्ञात समापनाची आहुती टाकताना डॉ. भागवत यांनी काही वेळा आपल्या लोकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन टाकले, तर दुसऱ्या बाजूच्या लोकांचे डोळे उघडण्याचाही प्रयत्न केला, ही याची सर्वांत मोठी उपलब्धी म्हटली पाहिजे.
Powered By Sangraha 9.0