तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
valor-day-ex-servicemen-gathering : शौर्यदिन कार्यक्रम व माजी सैनिक मेळावा सोमवार, 29 सप्टेंबर रोजी बळीराजा चेतना भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ येथे अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे होते. यावेळी निवृत्त कॅप्टन दिनेश तत्त्ववादी आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील माजी सैनिक, दिवंगत सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिकांच्या विधवा तसेच त्यांचे अवलंबित व इतर नागरिक अशा 150 पेक्षा अधिक नागरिकांनी उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर देशासाठी प्राण अर्पण केलेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्ह्यातील शहीद सैनिकांच्या वीरपत्नी व वीरमातांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, स्वागतगीत आणि राष्ट्रगीत सादर करून वातावरण राष्ट्रभक्तीने भारून टाकले.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत सुदर्शन गायकवाड यांनी शौर्य दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेचा गौरव करताना त्यांनी जम्मू-काश्मीर येथील उरी हल्ल्यात शहीद झालेले वणी तालुक्यातील पुरडचे शिपाई विकास कुळमेथे यांचा उल्लेख करून त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली.
माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय आणि विधवा यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात अनिल खंडागळे यांनी सैनिकांच्या कुठल्याही अडीअडचणी असल्यास सोडविण्यात येईल व जिल्हा प्रशासन सैनिकांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान रेडेकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन यशवंत देशमुख यांनी केले.