नवी दिल्ली,
Vijay Kumar Malhotra passes away दिल्ली भाजपामधील ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे पहिले अध्यक्ष प्रा. विजय कुमार मल्होत्रा यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे. आज सकाळी सहा वाजता एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने भाजपसह संपूर्ण राजकीय विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रा. मल्होत्रा हे पाच वेळा खासदार आणि दोन वेळा आमदार राहिले. २००८ मध्ये भाजपाने त्यांना दिल्लीतील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून नामांकन दिले होते. १९९९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा पराभव केला होता. तसेच २००४ च्या निवडणुकीत ते दिल्लीत विजयी झालेले भाजपाचे एकमेव खासदार ठरले. २००८ ते २०१३ या काळात त्यांनी दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली.
भाजपाच्या दिल्लीतील संघटनाला बळकटी देण्यात आणि पक्षाचा मजबूत पाया रचण्यात मल्होत्रा यांचा मोलाचा वाटा होता. शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांनी दिल्ली विद्यापीठातून हिंदी साहित्यात एमए आणि पीएचडी केली होती. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी राजकारणात सक्रिय राहून संघटना आणि जनतेशी घट्ट नाळ जुळवून ठेवली. विशेष म्हणजे, दिल्ली भाजपाच्या स्थायी कार्यालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कालच उद्घाटन झाले आणि त्याच्यानंतर अवघ्या एका दिवसात प्रा. मल्होत्रा यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने दिल्ली भाजपाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा अध्याय संपला आहे.