शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

30 Sep 2025 21:31:46
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Teachers Constituency Elections : अमरावती विभागातील शिक्षक विधान परिषद मतदारसंघाच्या 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या प्रत्येक वेळी निवडणूकीपुर्वी नव्याने तयार करणे आवश्यक असल्याने, पात्र व्यक्तींनी विहित नमुन्यात (नमुना 19) नवीन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले. शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याबाबत कार्यक्रम व वेळापत्रकाची माहिती त्यांनी पत्रपरिषदेत दिली.
 
 

y30Sept-Collector 
 
 
 
मतदार नोंदणी कार्यक्रमासाठी अमरावती विभागीय आयुक्त हे मतदार नोंदणी अधिकारी असून जिल्हाधिकारी सहायक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी हे सहायक मतदार नोंदणी असून सर्व तालुक्यांचे तहसीलदार हे पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडे नमुना-19 मधील अर्ज 6 नोव्हेंबरपर्यंत सादर करता येतील. मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सूचना 30 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. मतदार नोंदणी अधिनियमानुसार वर्तमानपत्रातील सूचनेची प्रथम पुनर्प्रसिद्धी 15 ऑक्टोबर रोजी होईल. तर द्वितीय पुनर्प्रसिद्धी 25 ऑक्टोबर रोजी होईल.
 
 
नमुना-19 द्वारे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर आहे. हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई 20 नोव्हेंबर रोजी होईल. प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी 25 नोव्हेंबर होईल. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर असा आहे. दावे व हरकती निकाली काढणे व पुरवणी यादी तयार करणे, छपाई करणे यासाठी 25 डिसेंबर हा दिवस निश्चित आहे. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 30 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.
पात्रता निकष
 
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 नुसार निवडणूक आयोगाच्या मान्यतेने निश्चित केलेल्या माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये अर्हता दिनांकापूर्वीच्या लगतच्या 6 वर्षांमध्ये किमान 3 वर्षे पूर्णवेळ शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक मतदार म्हणून नोंदणीपात्र असून त्यांना त्यासाठी सुधारित नमुना क्रमांक 19 मध्ये आवश्यक कागदपत्रांसह व प्रमाणपत्रांसह अर्ज सादर करता येईल.
एकगठ्ठा अर्ज नाही
 
ज्यांची नावे या मतदारसंघाच्या विद्यमान मतदार यादीमध्ये आहेत, त्यांनाही नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. एकगठ्ठा अर्ज, मग ते व्यक्तिशः दाखल केलेले अथवा पोस्टाने पाठविलेले असोत, विचारात घेतले जाणार नाहीत. तथापि, पात्र शैक्षणिक संस्थेचे प्रमुख संस्थेतील सर्व पात्र व्यक्तींचे अर्ज एकत्रित पाठवू शकतील.
 
 
एकाच पत्त्यावर राहणाèया एखाद्या कुटुंबातील अन्य पात्र व्यक्तींचे अर्ज कुटुंबातील सदस्य दाखल करू शकेल व त्यास अशा व्यक्तींची मूळ प्रमाणपत्रे पडताळणीसाठी अर्जासोबत सादर करावी लागतील. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षकांनी वेळापत्रकानुसार सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात विहित ननुना 19 मधील अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी मीना यांनी केले.
Powered By Sangraha 9.0