वेध
रेवती जोशी-अंधारे
9850339240
Ganesh immersion : उण्यापुऱ्या 133 वर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य उत्सव झाला आहे. घरोघरी, गल्लीबोळात हजारोंच्या संख्येत श्री गणेशाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होते. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली ते आज नसले तरी त्यांची जागा घेणारी नवी उद्दिष्टे आपण स्थापित करू शकलो नाही, हे सत्य स्वीकारावे लागेल. आपल्या हदू धर्माला विज्ञानाचे अधिष्ठान आहे, निसर्गाची बूज राखून सण साजरे करण्याचा संस्कार आहे. म्हणूनच, गणेशोत्सवाच्या सार्धशतीकडे वाटचाल करताना, निसर्गाप्रती आपल्या जबाबदारीसोबतच मर्यादांचा विचार करून निर्णय घेण्याची वेळ आहे.
मग काय आम्ही सण साजरा करायचाच नाही का? हदूंनाच हे ज्ञान सांगता, इतर धर्मीयांचे काय? असे प्रश्न उपस्थित होतील. त्यावर एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे हदूंएवढा जबाबदार आणि स्थितिसापेक्ष बदल स्वीकारणारा समाज दुसरा कुठलाही नाही. मध्ययुगात जगणाऱ्यांना असू द्या तिथेच! प्लॅस्टर ऑफ पॅरिस, रासायनिक रंग, सजावटीचे थर्माकोल, नकली दागिने, मातीचे प्रकार, मूर्तीचे आकार, उंची, महाप्रसादासाठी प्लॅस्टिकच्या ताटवाट्या आणि अशा अनेक वस्तूंच्या माध्यमातून गणेशोत्सवाचा विचार ही तातडीची गरज आहे.
अवाढव्य मूर्तींची स्थापना करणाऱ्या मंडळांच्या सदस्यांनी सामाजिक भान जागे ठेवून, मूर्तीच्या उंची आणि एकूणच आकारावर स्वयंस्फूर्तीने निर्णय घ्यावा. लहान मूर्ती मांडली म्हणून भक्ती-श्रद्धा कमी होत नाही. पण, त्यामुळे दर्शनाला येणाऱ्या भाविकांची रांग लागणार नाही, मंडळाचे उत्पन्न घटेल, सेलिब्रिटी येणार नाहीत, राजकीय नेतृत्त्वाचीही उणीव भासेल. मात्र, पर्यावरण जपल्याचे समाधान मिळेल. महत्त्वाचे म्हणजे आज ना उद्या हे निर्णय आपल्याला घ्यावेच लागणार आहेत. सरकारी यंत्रणा, न्यायालयीन प्रक्रिया, पोलिसांची कारवाई इतका द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा आपण स्वत:हूनच असे निर्णय घेणे श्रेयस्कर आहे.
कोणत्याही मूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन निसर्गनियमांना धरून नाही. पीओपी असो की चिकण माती, भूजलातील नैसर्गिक झरे बुजविण्याचे काम ती करते. कृत्रिम हौदांमध्ये, घरी टाक्यात, बादलीत कवा मोठ्या पपात मूर्तीचे विसर्जन करणे, हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. शास्त्रानुसार, पार्थिव मूर्तीचे विसर्जन तिच्या मूळ स्वरूपात म्हणजे जलतत्वात करावे, असे सांगितले आहे. ते करताना मूर्ती पाण्यात पूर्ण बुडणे अपेक्षित आहे. आपण किमान 10 फूटांच्या वर उंचीच्या मूर्ती मांडतो. इतक्या खोलीचा जलसाठा आपल्याकडे आहे का? त्यात किती मूर्ती विसर्जित होऊ शकतील? मूर्ती विसर्जित होतील की, दुसऱ्या दिवशी मूर्तीचे अवयव आणि लाकडी पाट्या पाण्यावर तरंगतील? याचा ताळमेळ आपण नाही तर कोण मांडणार?
यंदा नागपुरात 51 फूट उंच श्री गणेश मूर्तीची स्थापना झाली. गणरायाची दैनंदिन पूजा, हार घालणे वगैरे टास्क, अग्निशमन दलाच्या शिड्या वापरूनच करावे लागले. खरा प्रश्न विसर्जनाचा! मूर्तीकाराने लाकडी आराखड्यावर मातीचे तुलनेने पातळ लेपन करून मूर्ती तयार केली आहे. शिवाय, मूर्तीच्या आत प्लॅस्टिकचे किमात 8-10 पाईप घालून त्यांची तोंडे बाहेरच्या बाजूने उघडी ठेवली आहेत. हे पाईप देवाच्या विविध अवयवांमध्ये आहेत. विसर्जनाच्या वेळी बाहेरच्या तोंडातून या पाईपमध्ये एकेक करून पाणी सोडले जाईल आणि जागेवरच मूर्तीचे विसर्जन होईल. आता हा प्रयोग प्रत्यक्षात किती यशस्वी होतो, हे बघावे लागेल. मूर्तीची विटंबना न होता, जागेवरच श्रीगणेश निराकार होणार असतील, तर भविष्यात मोठ्या प्रमाणावर असे प्रयोग राबविता येतील. मोठ्या मूर्ती घडविण्यासह नैसर्गिक जलस्रोतही सुरक्षित ठेवता येतील.
गोमय, कागदाचा लगदा यापासून बनविलेल्या गणेशमूर्तींचा पर्यायी विचार आवश्यक आहे. या मूर्ती घरीच विसर्जित करून, मातीचा पुनर्वापर करता येईल. त्यात फुलझाडं वगैरे लावण्याचे कवा खत बनविण्याचे पर्याय आहेत. नैसर्गिक जलस्रोतांचे तंत्र बिघडले की काय होतं कवा होऊ शकतं, हे उत्तर भारतातील पूरस्थितीवरून लक्षात येईल. राजधानी दिल्लीतही स्थिती वेगळी नाही. तुलनेने मैदानी भाग सुरक्षित असले तरी विदर्भातही शहरांमध्ये पाणी साचायला एक जोरदार पाऊस पुरेसा असतो, हे आपण अनुभवत आहोत.
तलाव-विहिरींच्या नियमित गाळ उपशासह, आपल्या बाप्पाचे सुरक्षित आणि विचारपूर्वक विसर्जन हे नवे शास्त्र आपल्याला अंगीकारावे लागणार आहे. तरच पुनरागमनायच... म्हणण्यास आपण पात्र राहू!