मुंबई,
Alia Bhatt Sharvari Wagh या वर्षाच्या अखेरच्या काही महिन्यांत अनेक मोठे चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्यातील सर्वात मोठा प्रोजेक्ट म्हणजे YRF स्पाय युनिव्हर्सचा पहिला फीमेल स्पाय चित्रपट. या चित्रपटात आलिया भट्ट आणि शरवरी वाघ प्रमुख भूमिकेत दिसणार असून, यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.‘वॉर 2’ अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरला नाही. त्यामुळे आता संपूर्ण इंडस्ट्रीचे लक्ष आलिया-शरवरीच्या या चित्रपटावर लागले आहे. दिग्दर्शक शिव रवैल यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शरवरी वाघने अलीकडेच या चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला. एका कार्यक्रमादरम्यान ती म्हणाली, “२५ डिसेंबरला माझा ‘अल्फा’ चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि यासाठी मी खूप उत्सुक आहे.” सध्या ती या भूमिकेसाठी कडक प्रशिक्षण घेत आहे. चित्रपटातील अॅक्शन सीनसाठी ती विशेष तयारी करत असल्याचे तिने स्पष्ट केले.
आलिया भट्ट आणि शरवरी वाघ या दोघींनाही समान महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. मात्र शरवरीची तयारी पाहता ती आलियाला टक्कर देऊ शकते, अशी चर्चा रंगू लागली आहे. YRF स्पाय युनिव्हर्सला आतापर्यंत ‘टायगर’ आणि ‘पठाण’ मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे पहिल्या महिला गुप्तहेर चित्रपटाबाबत अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत.या चित्रपटात बॉबी देओलचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ते पहिल्यांदाच या युनिव्हर्समध्ये प्रवेश करत असून, ते खलनायकाच्या दमदार भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या या भूमिकेकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा प्रचंड आहेत. जर ते आपल्या अभिनयाने प्रभाव पाडू शकले, तर या युनिव्हर्समध्ये त्यांची ओळख एक जबरदस्त व्हिलन म्हणून होऊ शकते.‘अल्फा’मुळे केवळ YRF च्या स्पाय युनिव्हर्सला नवा टप्पा मिळणार नाही, तर आलिया-शरवरी या दोघींच्या अभिनयाचीही मोठी परीक्षा होणार आहे. आता २५ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी प्रेक्षकांना अजून किती दिवस वाट पाहावी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.