मुंबई,
Salman Khan ‘बिग बॉस 19’च्या 6 सप्टेंबरच्या भागात सलमान खान यांनी अमाल मलिक, गौरव खन्ना, नेहल आणि फरहाना भट्ट यांसारख्या अनेक स्पर्धकांची चांगलीच क्लास घेतली. मात्र त्याच वेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. कारण त्यांच्या या विधानाचा संबंध लोकांनी थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि शांतता पुरस्काराशी जोडला आहे.
घडले असे की, स्पर्धक फरहाना भट्ट हिने काही दिवसांपूर्वी नीलम गिरीसोबत जोरदार वाद घातला होता आणि अपशब्दही वापरले होते. फरहाना ही अभिनेत्री असून ती ‘पीस अॅक्टिव्हिस्ट’ म्हणूनही काम करते. यावर प्रतिक्रिया देताना सलमान म्हणाले, “पीस अॅक्टिव्हिस्ट म्हणजे भांडणं मिटवून, मैत्री घडवून आणणं. पण हे काय चाललंय जगभरात? जे सर्वाधिक गोंधळ घडवत आहेत, त्यांनाच शांतता पुरस्कार हवा असतो.”सलमान खान यांनी थेट कोणाचे नाव घेतले नाही. मात्र प्रेक्षकांनी त्यांचे हे विधान डोनाल्ड ट्रम्पशी जोडले. ट्रम्प यांनी अनेकदा आंतरराष्ट्रीय वाद मिटवण्याचा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या समर्थकांनी त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळावा, अशी मागणीही केली होती.याच पार्श्वभूमीवर सलमानच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या. एका युजरने लिहिले, “सलमान खान बिग बॉस 19 होस्ट करताना थेट डोनाल्ड ट्रम्पवर निशाणा साधला.” तर दुसऱ्याने लिहिले, “मेगास्टार सलमान खान यांनी डोनाल्ड ट्रम्पला ट्रोल केले.” अशा अनेक कमेंट्समुळे या चर्चेला अधिक उधाण आले आहे.