बांगलादेशात हिंदू असुरक्षित...सुनामगंजमध्ये आणखी एका हिंदूची हत्या

10 Jan 2026 16:53:04
ढाका,
A Hindu was murdered in Sunamganj. बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुनामगंज जिल्ह्यात जॉय महापात्रा या हिंदू तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, जॉय यांना आधी अमानुष मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर विष देण्यात आले. प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर त्यांना सिल्हेट येथील एमएजी उस्मानी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच आयसीयूमध्ये त्यांचा मृत्यू झाला.
 
 
A Hindu was murdered in Sunamganj.
 
ही घटना एकटी नाही. गेल्या काही आठवड्यांत बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच मिथुन सरकार नावाच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. चोरीच्या संशयावरून जमावाने पाठलाग केल्यानंतर प्राण वाचवण्यासाठी तो कालव्यात उडी मारत होता, मात्र त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह नंतर भंडारपूर गावाजवळ सापडला.
 
 
विविध माध्यमे आणि मानवाधिकार संघटनांच्या अहवालानुसार, अवघ्या १८ ते २० दिवसांत किमान सहा ते सात हिंदूंची हत्या झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये मैमनसिंगमधील दीपू चंद्र दास, जशोरमधील राणा प्रताप बैरागी, नरसिंगडीतील मोनी चक्रवर्ती आणि नौगावमधील मिथुन सरकार यांचा समावेश आहे. या घटना वेगवेगळ्या भागांत घडल्या असल्या तरी त्यामागील असुरक्षिततेची भावना समान असल्याचे चित्र आहे. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे बांगलादेशातील हिंदू समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अंतरिम सरकार आणि युनुस यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले कधी उचलली जाणार, असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.
Powered By Sangraha 9.0