भारतातील झेन-जी राष्ट्रप्रथम भावनेतून कार्यरत आहे

10 Jan 2026 20:26:17
गडचिरोली, 
 
abvp-gadchiroli-genz आज जगात सर्वत्र संघर्षाची स्थिती निर्माण झाली असून, याला कारणीभूत अमेरिकेतील डिप स्टेट आहेत. या डिप स्टेटच्या माध्यमातून अनेक राष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारताच्या शेजारी नेपाळ, श्रीलंका, बांग्लादेश हे याचे उदाहरण आहे. भारतातही याप्रकारचे प्रयत्न देशातील तरुणांना हाताशी धरुन अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण भारतातील युवा झेन-जी हे राष्ट्रप्रथम या मानसिकतेत असून राष्ट्रभक्त युवा विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून हे षडयंत्र निश्‍चितपणे विफल करेल, असा विश्‍वास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री विरेंद्र सोळंकी यांनी व्यक्त केला आहे.
  
 
 

abvp-gadchiroli-genz 
(मार्गदर्शन करताना विरेंद्र सोळंकी, मंचावर डॉ. श्रीकांत पर्बत, देवाशिष गोतरकर, पायल किनाके) 
 
 
abvp-gadchiroli-genz गडचिरोलीत अभाविपचे 54 वे प्रांत अधिवेशन सुरू असून, आज 10 जानेवारी रोजी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप जाहीर सभेत करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अभाविपचे प्रांत अध्यक्ष डॉ. श्रीकांत पर्बत, प्रांत मंत्री देवाशिष गोतरकर, राष्ट्रीय मंत्री पायल किनाके व विदर्भातील छात्रनेते उपस्थित होते. पुढे बोलताना सोळंकी यांनी युवकांना रोजगार मागणारा नाही तर रोजगार देणारा युवक निर्माण झाला पाहिजे, असे आवाहन केले. सध्या केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण संपूर्ण देशात लागू करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. हे नवीन शैक्षणिक धोरण संपूर्ण देशात एकछत्रपणे लागू करावे, असेही आवाहन त्यांनी केले.
 
 
abvp-gadchiroli-genz आजची छात्रशक्ती देशात कार्यरत असलेल्या विभाजनकारी शक्तींना समर्थपणे तोंड देत असून, यामध्ये अभाविपच्या छात्रशक्तीचा मोठा सहभाग आहे, असे ते यावेळी म्हणाले. या जाहीर सभेत विदर्भातील राज मिश्रा, सुहास मोरे, मोसम पटले, सुजान चौधरी, रिधीमा शहा, रोहित श्रीरामवार या छात्रनेत्यांचे विविध विषयांवर मार्गदर्शन झाले. या जाहीर सभेचे संचालन उत्कर्षा बावनथडे यांनी केले. जाहीर सभेत गडचिरोली शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0