वजन वाढीचा थेट मानसिक आरोग्यावर परिणाम!

10 Jan 2026 13:10:49
नवी दिल्ली,
AIIMS's shocking revelation तरुणांमध्ये वाढत चाललेली वजनाची समस्या आता केवळ शारीरिक मर्यादित न राहता मानसिक आरोग्यासाठीही गंभीर ठरत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एम्स आणि आयसीएमआरच्या संयुक्त अभ्यासातून समोर आला आहे. या अभ्यासानुसार जास्त किंवा कमी वजन असलेले तरुण मोठ्या प्रमाणात मानसिक तणाव, आत्मविश्वासाचा अभाव आणि शरीराच्या प्रतिमेबाबत अस्वस्थता अनुभवत आहेत. त्यामुळे वजन हा केवळ शरीराचा प्रश्न न राहता मनालाही आजारी बनवत असल्याचे स्पष्ट होत आहे.
 
 
AIIMS
 
जगातील सर्वाधिक वजनदार व्यक्ती म्हणून ओळख मिळालेल्या सौदी अरेबियाच्या खालिद मोहसिन यांचा ६१० किलोवरून ६३ किलोपर्यंतचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. विशेष म्हणजे, वजन जास्त असतानाही आणि कमी झाल्यानंतरही तो कायम हसतमुख राहिला. मात्र तज्ज्ञांच्या मते, फक्त आनंदी चेहरा पुरेसा नसून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करणे आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. आज देशातील अनेक तरुण सतत स्वतःच्या शरीराकडे संशयाने पाहत आहेत. शरीराच्या प्रतिमेबाबतची ही सततची चिंता ‘बॉडी इमेज डिसऑर्डर’ नसली, तरी मानसिक आरोग्यावर खोल परिणाम करणारी स्थिती असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
एम्स–आयसीएमआरच्या संशोधनानुसार ४९ टक्के जादा वजनाचे आणि ४७ टक्के कमी वजनाचे तरुण आपल्या वजनाबाबत कायम चिंतेत असतात. जाड तरुणांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव आणि संकोच जास्त दिसून आला, तर कमी वजनाच्या तरुणांमध्ये एकटेपणा, तणाव आणि लाजिरवाणेपणाची भावना अधिक आढळली. चारपैकी एक तरुण स्वतःबद्दल नकारात्मक भावना बाळगत असल्याने त्याचे मानसिक आरोग्य ढासळत असल्याचा इशाराही या अभ्यासातून देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे, देशाचे आरोग्य धोरण प्रामुख्याने लठ्ठपणावर लक्ष केंद्रीत करत असताना, कमी वजनाच्या तरुणांच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार भारतात प्रत्येक चारपैकी एक व्यक्ती लठ्ठ आहे आणि गेल्या १५ वर्षांत ही संख्या दुप्पट झाली आहे. विशेषतः पोटावरील चरबी भारतीयांसाठी मोठा धोका ठरत आहे. ही चरबी केवळ बाह्य स्वरूप बिघडवत नाही, तर हृदय, यकृत, स्वादुपिंड आणि मूत्रपिंड यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवरही गंभीर परिणाम करत आहे. तज्ज्ञांच्या मते वजन नियंत्रणासाठी आहार, जीवनशैली आणि मानसिक आरोग्य या तिन्ही बाबींवर एकत्रित लक्ष देणे आवश्यक आहे. सकाळी कोमट लिंबूपाणी, संतुलित आहार, योग्य वेळेत जेवण, पचन सुधारणारे उपाय आणि नियमित व्यायाम यासोबत स्वतःच्या शरीराला स्वीकारण्याची मानसिकताही तितकीच महत्त्वाची आहे. अन्यथा वाढते वजन केवळ शरीरालाच नाही, तर संपूर्ण पिढीच्या मानसिक आरोग्यालाही आव्हान ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Powered By Sangraha 9.0