इतिहासातील अपमानाचा हिशेब चुकता करण्याची वेळ!

10 Jan 2026 12:49:27
नवी दिल्ली,
Ajit Doval's blunt message नवी दिल्ली येथे आयोजित विकसित भारत युवा नेते संवाद या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देशाच्या शत्रूंना स्पष्ट आणि कठोर शब्दांत इशारा दिला. त्यांनी आपल्या भाषणात भारताच्या इतिहासाचा उल्लेख करत सांगितले की आजचा स्वतंत्र भारत सहज मिळालेला नाही. या स्वातंत्र्यासाठी आपल्या पूर्वजांनी अमानुष अत्याचार, अपमान आणि असहाय्यतेचे काळ सहन केले. अनेकांना फाशी देण्यात आले, गावे उद्ध्वस्त करण्यात आली, संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न झाले आणि धार्मिक स्थळांची लूट झाली. त्या काळात देशाला मूक प्रेक्षक बनून सर्व सहन करावे लागले, अशी आठवण त्यांनी करून दिली.
 
 
 
Ajit Doval
अजित डोवाल म्हणाले की हा इतिहास आजच्या पिढीला प्रश्न विचारतो. भारतातील प्रत्येक तरुणाच्या मनात बदलाची, आत्मसन्मानाची आणि निर्णायक कृतीची ज्वाला पेटली पाहिजे. ‘सूड’ हा शब्द आदर्श वाटत नसला, तरी तो एक प्रभावी प्रेरणा ठरू शकतो. आपल्या इतिहासातून मिळालेल्या जखमांची जाणीव ठेवून भारताला पुन्हा त्या उंचीवर नेणे आवश्यक आहे, जिथे देश स्वतःच्या हक्कांवर, विचारांवर आणि श्रद्धांवर आधारित एक सशक्त आणि महान राष्ट्र म्हणून उभा राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
 
आपली संस्कृती प्रगत आणि समृद्ध होती, असे नमूद करताना त्यांनी सांगितले की भारताने कधीही इतरांच्या धार्मिक स्थळांवर आक्रमण केले नाही, लुटालूट करण्यासाठी मोहिमा राबवल्या नाहीत किंवा परकीय भूमीवर हल्ले केले नाहीत. मात्र, आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक धडे वेळेवर न शिकल्याची चूक भारताने केली. इतिहासाने वारंवार शिकवले की निष्काळजीपणा महागात पडतो. हा धडा जर भावी पिढ्यांनी विसरला, तर ती भारतासाठी सर्वात मोठी शोकांतिका ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.
 
भाषणाच्या शेवटी अजित डोवाल यांनी इच्छाशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. व्यक्तीची इच्छाशक्तीच पुढे जाऊन राष्ट्रीय शक्ती बनते, असे सांगत त्यांनी युद्धाचा अर्थ स्पष्ट केला. युद्धे शत्रूच्या मृतदेहांवर आनंद मिळवण्यासाठी लढली जात नाहीत, तर शत्रूचे मनोबल खच्ची करून त्याला आपल्या अटी मान्य करण्यास भाग पाडण्यासाठी लढली जातात. उद्दिष्ट साध्य करणे हाच युद्धाचा खरा हेतू असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
Powered By Sangraha 9.0